(Source: ECI/ABP News/ABP Majha)
K Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव घेणार तुळजाभवानीचे दर्शन, मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण
K Chandrashekar Rao :तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज ते धाराशिवमध्ये तुळजाभवानीचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान आज त्यांनी पंढपुरात विठ्ठलाचे देखील दर्शन घेतले.
K Chandrashekar Rao : बीआरएसने (BRS) महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज पंढपुरात (Pandharpur) विठुरायाचे दर्शन घेतले असून आता ते धाराशिवमध्ये तुळजाभवानीचे (Tuljabhavani Temple) दर्शन घेणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांच्याबरोबर आलेल्या 25 मंत्र्यांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिरात परवानगी देण्यात आली आहे. परंतु केसीआर यांच्याबरोबर आलेल्या पदाधिकाऱ्यांना मात्र रांगेतूनच आई तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी आई तुळजाभवानीचे प्रवेशद्वार सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पण मुख्यमंत्री केसीआर यांच्याबरोबर किती जणांना मंदिरात प्रेवश द्यायचा हे निश्चित नव्हते. पण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि मंदिर प्रशासनाने मंदिर परिस्थितीचा आढावा घेऊन मुंख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासह पंचवीस जणांना प्रवेश देण्याचे निश्चित केले.
तुळजाभवानीच्या मंदिर प्रशासानाकडून देखील पूजेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे तुळजाभवानीची विधीवत पूजा करणार असल्याने खण नारळाची ओटी प्रसाद आणि खास तुळजाभवानीसाठी आणलेली साडी घेऊन पुजारी सज्ज झाले आहेत.
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव विठुरायाच्या चरणी
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढपुरात जाऊन विठुरायाचं देखील दर्शन घेतलं आहे. त्यांच्यासोबत काही सहकाऱ्यांनी देखील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं. तर मंत्र्यांसह आमदार, खासदारांना मात्र बाहेरुनच नामेदव पायरीचे दर्शन घ्यावं लागलं. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळं मोजक्याच कोअर कमिटीच्या लोकांनी के चंद्रशेखर राव यांच्यासोबत मंदिरात सोडण्यात आलं होतं.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हेलिकॉप्टरने करण्यात येणाऱ्या पुष्पवृष्टीला प्रशासनाने परवानगी नाकारली. कारण सध्या पंढपुरात वारकऱ्यांची बरीच गर्दी आहे. सध्या पाच लाखापेक्षा जास्त वारकरी भाविक वाखरी रिंगण सोहळ्यात उपस्थित राहतात. त्यामुळे हॅलिकोप्टरने पुष्पवृष्टी करताना दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगी नाकारल्याची सांगण्यात येत होतं.
प्रशासनाच्या या निर्णयावर बीआरएस पक्षाकडून तीव्र नाराजी देखील व्यक्त करण्यात आली आहे. इथल्या सरकारने वारकऱ्यांवरती लाठ्या बरसवल्या आम्ही जर पुष्पवृष्टी केली तर लोकांमध्ये नकारात्मक संदेश जाईल म्हणून परवानगी नाकारण्यात आली असल्याचा आरोप बीआरएस पक्षाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान मंगळवेढा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केला. यावेळी भगीरथ भालके यांनी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणात केलेल्या कार्याचे कौतुक केलं.