Omraje Nimbalkar VS Ranajagjitsinha Patil: नादी लागू नको माझ्या तूला चांगलाच रडवीन...; गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार ओमराजे अन् आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुत्र आमनेसामने
Omraje Nimbalkar VS Ranajagjitsinha Patil : गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उबाठाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने-सामने आले.

Omraje Nimbalkar VS Ranajagjitsinha Patil : गणेश विसर्जनाच्या (Ganesh Visarjan 2025) मिरवणुकीदरम्यान धाराशिवमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून आले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांचे पुत्र मल्हार पाटील (Malhar Patil) यांच्यात मिरवणुकीदरम्यान थेट आमना-सामना झाला. यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच (Elections) राजकीय रंगत वाढली आहे.
विसर्जन मिरवणुकीतून 'सामना'; समर्थकांचा गराडा
गणेश विसर्जन मिरवणूक नित्यनियमाने उत्साहात पार पडत असली तरी यावेळी राजकीय वर्चस्वाची झलकही पाहायला मिळाली. भाजपचे युवा नेते मल्हार पाटील हे आपल्या समर्थकांसह मिरवणुकीत सहभागी झाले असताना, दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर हेही मिरवणुकीत सहभागी झाले होते. याच दरम्यान दोघांचे मार्ग एकत्र आले आणि मल्हार पाटील यांना त्यांच्या समर्थकांनी गराड्यात घेत, ओमराजे निंबाळकर यांना थेट दंड थोपटून आव्हान दिले.
“नादी नको लागू माझ्या...” गाण्यावर रील व्हायरल, ओमराजेंचा प्रतिसाद
घटनेच्या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी "नादी नको लागू माझ्या, तुला चांगलाच रडविन... ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडविन..." या गाण्यावर मल्हार पाटील यांचे रील्स सोशल मीडियावर पोस्ट केल्याने ती क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. हे गाणं ऐकत असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर हे एकीकडे स्मित हास्य करत भाजप कार्यकर्त्यांकडे शांतपणे पाहताना या रीलमध्ये दिसत आहेत. त्यांच्या संयमित प्रतिसादाची चर्चा देखील सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
धाराशिवमध्ये चर्चांना उधाण
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असताना, धाराशिवमधील ही घटना भाजप आणि शिवसेना (उबाठा गट) यांच्यातील संघर्षाचे संकेत देणारी ठरत आहे. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह आणि सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा पाहता, आगामी निवडणुका अधिकच रंगतदार होतील, हे स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे धाराशिवमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























