Osmanabad: जून 2024 पर्यंत उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणात पाणी येणार; मंत्री सावंत यांचा दावा
Osmanabad News : मे-जून 2024 पर्यंत उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणात पाणी आणणार असल्याचा दावा मंत्री सावंत यांनी केला आहे.
Osmanabad News : उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचा विकास हाच माझा उद्देश आहे. आवश्यक आणि मुबलक पाणी उपलब्ध करुन देणे ही माझी जबाबदारी समजतो. त्यामुळेच 11 हजार कोटी रुपये खर्च करुन उजनी धरणातून (Ujani Dam) सात टीएमसी पाणी सीना-कोळेगाव (Sina Kolegaon Dam) या धरणात आणण्याची मंजुरी मिळालेली आहे. जून 2024 पर्यंत कोळेगाव धरणात हे पाणी येणार याचा मला विश्वास आहे. या पाण्याचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होईल असा मला विश्वास असल्याचं पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत म्हणाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा येथे 8 ऑगस्ट रोजी संजय गांधी निराधार योजना, अपंग लाभार्थी योजना आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत बोलत होते. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, यंत्रणांच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी. त्यांच्यासाठी शासनाने आखलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करावे. त्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करावी. प्रत्येक योजनेचा शेवटच्या शेतकऱ्याला लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तर, शेतकरी आणि जनतेला केंद्रबिंदू ठेवून काम करा आणि झिरो पेंडन्सीचा अवलंब करुन सर्व प्रलंबित कामे निकाली काढा असेही ते यावेळी म्हणाले. तर मे-जून 2024 पर्यंत उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणात पाणी आणणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
शासकीय योजना ही लोकांच्या कल्याणासाठी
या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना अपंग लाभार्थी योजना श्रावण बाळ योजना यांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात पालकमंत्र्यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य, महिला भगिनी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. तर प्रत्येक शासकीय योजना ही लोकांच्या कल्याणासाठी आखली जाते. योजना ह्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने कार्यान्वित केल्या जातात. त्यामुळे योजनांचा लाभ घेण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका. जर कोणी तशी मागणी करत असेल तर त्याची तक्रार करा. आपल्याला मिळणारा लाभ हा आपला अधिकार आहे. आपल्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी " शासन आपल्या दारी " या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सर्व योजनांची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय...
उजनी धरणातील वाहून जाणारे पाणी सीना-कोळेगाव प्रकल्पात आणण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा-लोकसभा निवडणुकीत देखील हा मुद्दा चांगलाच गाजत असतो. मात्र, आता पुन्हा एकदा यावरुन राजकारणा पाहायला मिळत होते. दरम्यान, आता या योजनेला मंजुरी मिळाली आहे. तर, 11 हजार कोटी रुपये खर्च करून उजनी धरणातून सात टीएमसी पाणी सीना- कोळेगाव या धरणात आणण्याची मंजुरी मिळालेली असल्याने जून 2024 पर्यंत हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा दावा पालकमंत्री सावंत यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Agriculture News : गोगलगाय नियंत्रणासाठी कृषी विभागाने सुचवला 'हा' पर्याय; असा होणार फायदा