Kailas Patil : शेरकर यांच्या शेतीतील उसानं त्यांनाच पोलिसांनी मारलं, पोलीस काम कुणासाठी करतात? : कैलास पाटील
Kailas Patil : धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. यावरुन आमदार कैलास पाटील यांनी पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

धाराशीव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केले आहेत. पोलीस काम कुणासाठी करत आहेत सर्वसामान्य जनतेसाठी कि पवनचक्की माफियांसाठी? असा प्रश्न कैलास पाटील यांनी विचारला आहे. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादात शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा, असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केल्याची घटना घडली या घटनेवरुन कैलास पाटील आक्रमक झाले आहेत.
कैलास पाटील यांनी काय म्हटलं?
पोलीस काम कुणासाठी करत आहेत सर्वसामान्य जनतेसाठी की पवनचक्की माफियांसाठी?
स्थळ : तांदुळवाडी, तालुका : वाशी, जिल्हा : धाराशिव
मराठवाड्यात आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीचा विषय गंभीर होतो आहे. आज समोर आलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. एकाच शिवारात दोन कंपन्यांनी पवनचक्की उभ्या केल्या आहेत. एका कंपनीने जो मावेजा दिला आहे, किमान तितका तरी द्यावा, अशी मागणी तांदुळवाडी येथील गणेश शेरकर यांनी केली. मात्र, आपल्या पोलिसांनी त्यांचेच काय हाल ते पहाच..
योग्य मावेजा दूरच, पण किती गंभीर मारहाण त्यांना झाली तेही पोलीस प्रशासनाकडून.. करावा तितका निषेध कमी आहे. शेरकर यांच्या शेतीतील उसाने त्यांनाच पोलिसांनी मारले. हे सरकार सामान्यांचे आहे की कंपन्याचे, हेच कळायला मार्ग नाही. ज्यांनी मार खाल्ला ते शेतकरी पोलिसांच्या ताब्यात आहेत, अशी माहिती आहे. असे जर असेल तर हे अतिगंभीर आहे. संबंधित शेतकऱ्यास न्याय मिळेपर्यंत आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू..
देवेंद्रजी तुमच्याच खात्यामार्फत हुकूमशाही चालू आहे काय? जनतेचे रक्षण करतेच जर जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांवर त्याच्याच शेतात त्याचाच पिकाने मारहाण करत असतील तर, शेतकरी कदापि सहन करणार नाही..
भाजप नगरसेवकावर देखील लाठीमार
पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मावेजा देण्याच्या ऐवजी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली. यावेळी भाजपा नगरसेवक राजु कवडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी मात्र शेतकरी आणि भाजपा नगरसेवक राजु कवडे यांच्यावर अमानुष लाठीमार केला. भाजप नगरसेवक ज्वलनशील पदार्थ घेऊन आला होता त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी लाठी चार्ज केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव

























