Dharashiv News : अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं केलं, सोयाबीन, कांदा पिक वाहून गेलं; धाराशिवमधील हवालदिल शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा
Dharashiv News : धाराशिवमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरानंतर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.

Dharashiv News : धाराशिवमध्ये (Dharashiv) झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) आणि महापुरानंतर (Flood) शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे शेती उद्ध्वस्त झाल्याने एक शेतकरी लक्ष्मण बाबासाहेब पवार (वय 42, रा. म्हात्रेवाडी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कांदा पिकांचे पूर्णतः नुकसान, जमीन खरवडून जाणे आणि आर्थिक संकटामुळे ते मानसिक तणावाखाली होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हात्रेवाडी परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे शेतात पाणी साचले, नदीचे पाणी शिरले आणि जमिनीतील माती वाहून गेली. पीक तर वाहून गेलेच, पण पुन्हा शेतीस उभे करणे अशक्य होईल इतकी परिस्थिती निर्माण झाली. या सर्वांमुळे लक्ष्मण पवार हे हवालदिल झाले होते. यामुळे लक्ष्मण पवार यांनी यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे पवार कुटुंबावर दुःखाचं आभाळ कोसळलं आहे.
छत्रपती संभाजी राजेंकडून तातडीची मदत
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी म्हात्रेवाडी येथील पवार कुटुंबाला भेट देऊन 1 लाख रुपयांची तातडीची मदत केली. त्यांच्या या पावलाने कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला, मात्र राज्य सरकारकडून कोणतीही ठोस मदत अद्याप मिळालेली नाही. शेतकरी कुटुंबाला सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. तर गावकऱ्यांनी देखील सरकारकडे तत्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. वेळेवर मदत न झाल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
मराठवाड्यात शेतीचं मोठं नुकसान
दरम्यान, मराठवाड्यासह जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीने हाहाकार माजवला. मराठवाड्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली असून पावसाने अनेकांचे जीव घेतले आहेत. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाने कहर केला. मराठवाड्यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला. त्यात जिल्ह्यातील लातूर 3, धाराशिव 1, बीडमधील दोन तर नांदेडमध्ये एक जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात एकूण लहान-मोठी 150 जनावरे दगावली. त्यात संभाजीनगर जिल्ह्यात 5, जालना 15, परभणी जिल्हात 6, हिंगोलीमध्ये 6, नांदेड जिल्ह्यात 9, बीड जिल्ह्यात 63, लातूर जिल्ह्यामध्ये 7, धाराशिव जिल्ह्यातील 21 जनावरांचा समावेश आहे. तर यंदाच्या खरीप हंगामात जवळपास बाराशे मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक मंडळामध्ये दुबार, तिबार अतिवृष्टी झाली आहे. 17 सप्टेंबरपर्यंत 18 लाख 27 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं होतं. तर 18 सप्टेंबरपासून ते रविवारपर्यंत 4 लाख 91 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
आणखी वाचा























