Dharashiv Rain: घरात चिखलाचा खच, मुलांचे वह्या-पुस्तके पाण्यात; चिमुकले निशब्द, आई धाय मोकलून रडली, धाराशिवमध्ये भयावह परिस्थिती
Dharashiv Beed Rain: धाराशिव जिल्ह्यात पूरस्थिती बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं जिल्ह्यातील अनेक संसार उघड्यावर पडले आहेत.

Dharashiv Beed Rain: दुष्काळाचे चटके सहन करणारा मराठवाडा (Marathwada Rain) सध्या ओल्या दुष्काळानं ओलाचिंब झालाय. इतका इतका पाऊस झाला की मराठवाड्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि जनजीवन ठप्प झालं. धाराशीव, बीड, जालन्यात पावसाचं (Dharashiv Beed Rain) थैमान पाहायला मिळालंय. ज्या मराठवाड्याला दुष्काळात रेल्वेनं पाणी पोहोचवावं लागलं होतं. तिकडे आता हेलिकॉप्टरमधून लोकांचं रेस्क्यू करण्याची वेळ आली आहे. मराठवाड्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 124 टक्के पाऊस पडला आहे. सरासरी 604 मिमी 22 सप्टेंबरपर्यंत पाऊस होत असतो. मात्र 747 मिमी इतका सरासरी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. फक्त सप्टेंबरचा विचार करायचा 165 टक्के पाऊस मराठवाड्यात झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातही पूरस्थिती (Dharashiv Flood) बिकट झाली आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं जिल्ह्यातील अनेक संसार उघड्यावर पडले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. त्यामुळे नागरिक घरांच्या छतावर जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी छतावर अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आलंय. याचदरम्यान, धाराशिवमधील आंबी गावातील मुकेश गटकळ यांच्या घरात शिरलं पाणी शिरलं. यावेळी ABP माझाशी बोलताना घरातील महिलेच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
मुलांचे पुस्तक भिजले, घरात चिखलाचा खच- (Dharashiv Rain Marathi News)
धाराशिवमधील आंबी गावातील मुकेश गटकळ यांच्या घरात सर्वत्र चिखल झाला आहे. घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याचं दिसून येत आहे. मुलांचे वह्या-पुस्तक देखील पाण्याने भिजले आहे. घरात चिखलाचा खच तयार झाला आहे. मायबाप सरकारनेच आता आम्हाला मदत करावी, असं आवाहन गटकळ कुटुंबियांनी केलं आहे. घरातील परिस्थिती सांगताना महिलेला अश्रू अनावर झाले.
धाराशिवच्या पूरस्थितीवर अजित पवार लक्ष ठेऊन- (Ajit Pawar On Dharashiv Rains)
धाराशिव जिल्ह्यात भूम आणि परंडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूर परिस्थितीमुळे काल अनेक नागरिक अडकून पडले होते, दरम्यान या सर्व परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष ठेऊन आहेत. सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशनवर अजित पवार लक्ष देऊन आहेत. भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांना अजित पवारांनी फोन केला, आणि रेस्क्यू ऑपरेशनची माहिती घेतली.























