Dharashiv Crime : धाराशिवमध्ये वाळू माफियांच्या दोन गटात राडा; भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी
फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या संदर्भातील माहिती परंडा पोलीस निरीक्षक विनोद पवार यांनी दिली.
धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv Crime) परंडा तालुक्यातील वाळू माफियांच्या दोन गटात तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये भर दिवसा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बार्शीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाळूच्या वादातून दोन गटांमध्ये हा वाद झाला. दरम्यान, हा वाद पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एकाच्या कमरेत गोळी, दुसऱ्याच्या डोक्यात दगड
गोळीबारामध्ये कमरेला गोळी लागल्याने योगेश हनुमंत बुरंगे हा गंभीर जखमी झाला. कपिल आजिनाथ अलबत्तेच्या डोक्यात दगड घातल्याने जखमी झाला आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी चैतन्य शेळकेसह दोघेजण फरार झाले आहेत. त्यामुळे या फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. या संदर्भातील माहिती परंडा पोलीस निरीक्षक विनोद पवार यांनी दिली.
मद्यधुंद तलाठी कार्यालयातच झोपला!
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील तलाठ्याचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. गुणाजी ढोणे असं मद्यधुंद अवस्थेतील तलाठ्याच नाव असून परंडा तहसिल कार्यालयात ते अनेक वर्षांपासून कर्मचारी आहेत. परंडा तहसील कार्यालयात मद्यधुंद अवस्थेत हा तलाठी पोहोचला होता. हा अवतार पाहून सरकारी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली. नशेमध्ये धुंद झालेला तलाठी कार्यालय परिसरातच झोपला होता. बघ्यांची गर्दी तलाठ्याला पाहण्यासाठी जमल्यानंतर आता या मद्यधुंद महाशयांचं करायचं काय, असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. तहसील प्रशासनाने रुग्णवाहिकेला पाचारण करुन रुग्णावाहिकेतून सबंधित तलाठ्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून ढोणे तलाठी कोणतीही सूचना न देता होते गैरहजर राहिले होते. त्यांच्या या गैरहजरी वर्तनाबद्दल तहसिलदारांनी त्यांना नोटीसही बजावली होती.
इतर महत्वाच्या बातम्या