मराठी भाषेचा अभिमान, पण भाषेवरुनची मारहाण खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून ठणकावलं
देशातील अतिप्राचीन भाषांपैकी एक भाषा मराठी आहे, याचे अनेक पुराव सापडले आहेत. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली मागणी स्वीकारली असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोट्यवधी मराठीजनांसाठी आजचा दिवस आनंद आणि अभिमानाचाच म्हणावा लागेल. कारण, देशाची राजधानी दिल्लीतील जेएनयुमध्ये (JNU) मराठी भाषेचा गौरव आणि सन्मान करण्यात आलाय. येथील विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी भाषा अध्यासनाची आजपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यभाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितात हा सोहळा संपन्न झाला. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचा कोनशिला समारंभ आणि कुसुमाग्रज मराठी (Marathi) भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उदघाटन झाले. यावेळी, बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेचा अभिमान आहे, ती अभिजात आहे, असे म्हटले. मात्र, भाषेवरुन कुणाला मारहाण करणे योग्य नाही, ते खपवून घेणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
देशातील अतिप्राचीन भाषांपैकी एक भाषा मराठी आहे, याचे अनेक पुराव सापडले आहेत. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली मागणी स्वीकारली असून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. मराठी ही अगोदरच अभिजात होती, पण त्याला आता राजाश्रय मिळाला आहे. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मराठी भाषेने देशाला समृद्ध केलं आहे, आपली नाट्यसृष्टी हे सर्वोत्तम आहे. देशामध्ये थेअटरने जर कोणत्या भाषेनं टिकवलं आणि समृद्ध केलं असेल तर ती मराठी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना म्हटलं. म्हणूनच या भाषेवर अध्यसन आणि संधोशन झालं पाहिजे म्हणून हे अध्यसन केंद्र इथं झालंय, अशी माहितीही फडणवीसांनी दिली.
भाषेवरुनची मारहाण खपवून घेणार नाही
मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, त्यासोबतच इतर भारतीय भाषांचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. कारण, आम्ही इंग्रजीचा पुरस्कार करतो, इंग्रजीला पायघड्या घालतो आणि भारतीय भाषांना विरोध करतो, याचं कुठतरी दु:ख होतं. आपला वाद मराठी आणि हिंदी नाही. पण, मराठीसोबत इतर भारतीय भाषाही स्वीकारल्या पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह होणे स्वाभाविक आहे, ते चुकीचे नाही. मात्र, भाषेवरुन वाद होणे, कुणाला मारहाण करणे कदापि सहन केलं जाणार नाही. या अगोदरही आम्ही कारवाई केली असून यापुढेही कोणी तसा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हटले.
🕡 6.43pm | 24-7-2025📍New Delhi.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 24, 2025
LIVE | Media Interaction#Maharashtra #NewDelhi https://t.co/5hR3hwkOsx
हेही वाचा

























