(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : 'त्या' कुटुंबीयांना चार लाखांची मदत, सलील देशमुख यांच्या हस्ते चेकचे वितरण
वीज कोसळून नागपूर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला होता. या तीन कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. सलील देशमुख यांनी दोन्ही गावात जाऊन पीडित कुटुंबीयांना या चेकचे वाटप केले.
नागपूरः शनिवारी वीज कोसळून नरखेड तालुक्यातील हिवरमठ येथील योगेश पाठे तर पेठ मुक्तापूर येथील दिनेश कामडी व बाबाराव इंगळे यांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी आर विमला व सलील देशमुख यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. दरम्यान शासन स्तरावर या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी पाठपुरावा करत, या तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या मदती मिळवून दिली.
यावेळी सलील देशमुख यांच्यासोबत पंचायत समितीच्या सभापती नीलिमा रेवतकर, जिल्हा परिषद सदस्य प्रीतम कवरे, तहसीलदार बी. डी. जाधव, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, मयुर उमरकर यांच्यासह अतुल पेठे, सुधीर खडसे, नारायण ठाकरे,ज्ञानेश्वर माळोदे, मनीष फुके,तुषार माळोदे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मृतक तिन्ही कुटुंबातील हे करते पुरुष होते. घरातील कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर मोठे संकट उभे ठाकले होते. त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सलील देशमुख प्रयत्नशील होते. जिल्हाधिकारी यांनी भेटीच्या वेळेस त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देऊ असे सांगितले होते. पिडीत कुटुंबीयांना सलील देशमुख यांनी तातडीची स्वतःकडून आर्थिक मदत तर केलीच परंतु शासनाची मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
दोन दिवसातच ही मदत मंजूर करण्यात आली स्वतः सलील देशमुख यांनी दोन्ही गावात जाऊन पीडित कुटुंबीयांना या चेकचे वाटप केले. पेठ मुक्तापूर येथील मृतक बाबाराव इंगळे यांचा चेक त्यांच्या पत्नी मंदाबाई यांना तर दिनेश कांबळे यांचा चेक त्यांच्या पत्नी सुनंदा यांना देण्यात आला. हिवरमठ येथील मृतक योगेश पाठे यांचा चेक त्यांच्या पत्नी कल्याणी यांना देण्यात आला. जिल्हाधिकारी आर. विमला व सलील देशमुख यांनी पुढाकार घेऊन यापुढे कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून दिल्याबद्दल पदाधिकारी व गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहे.
मृतक दिनेश कामडी यांच्या पत्नी सुनंदा कामडी यांना मदतीचा चेक देतांना जि प सदस्य सलील देशमुख व इतर
मृतक बाबाराव इंगळे यांच्या पत्नी मंदाबाई इंगळे यांना मदतीचा चेक देतांना जि प सदस्य सलील देशमुख व इतर