भंडाऱ्यातील आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, काँग्रेसकडून जोरदार हल्लाबोल
Bhandara News : भंडाऱ्यातील आयुध निर्माण (Ordnance Factory) करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट (Explosion) झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेबाबत काँग्रेस नेत्यांनी सडकून टीका केली आहे.
भंडारा : भंडाऱ्यातील आयुध निर्माण (Ordnance Factory) करणाऱ्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट (Explosion) झाल्याची घटना घडली आहे. आज (24 जानेवारीला) साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती पुढे आले आहे. भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हा मोठा स्फोट झाला आहे. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा ब्लॉस्ट झाला असून या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर साबुदाण्यासारखा कच्चा माल जो आरडीएक्स बनवण्यासाठी वापरला जातो, त्यामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.
तर यातील अतिगंभीर पाच लोकांना सध्या भंडारा येथील खाजगी लक्स हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. दरम्यान या दुर्घटनेबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हळहळ व्यक्त करत मृतकांबाबत शोक व्यक्त केला आहे.
ही अतिशय दुर्दैवी घटना - विजय वडेट्टीवार
भंडाऱ्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. प्राथमिक माहिती माझ्याकडे आता आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. सध्या पाच जणांचा मृत्यू आणि अनेक जण यात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती माझ्याकडे असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिली आहे. तर दुसरीकडे या घटनेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अशी दुर्घटना हे मोदी सरकारचे अपयश, पहिल्यांदा असा स्फोट झाला- नाना पटोले
भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगारांबाबत मी शोक व्यक्त करतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात ऑर्डनसे फॅक्टरी देखील सुरक्षित नसल्याचे या निमित्याने पुढे आले आहे. आरडीएक्स (RDX) आयात करताना त्यात भ्रष्टाचार होतो, हे नरेंद्र मोदी सरकारचे अपयश असून पहिल्यांदा असा स्फोट झाला असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्याकडून मृतांना श्रद्धांजली
भंडारा जिल्ह्यातील ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असून त्या लवकरच पोहोचतील. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत. आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अशा शब्दांत हळहळ व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेबाबत भावना व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा