Crime News : पत्नीसोबत अनैतिक संबंधाचा संशय, पेट्रोल टाकून मित्राला जिवंत पेटवले; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Chhatrapati Sambhajinagar Crime : घरी आलेल्या मित्राच्या अंगावर पेट्रोलची बाटली ओतून पेटवून दिले होते. ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्राला पेट्रोल टाकून जिवंत पेटवून दिल्याच्या प्रकरणात एकाला जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दत्ता महादेव कराळे (30 रा. पंढरपूर ता. जि. छत्रपती संभाजीनगर) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. उमेश नामदेव दिवेकर (32 वर्षे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील आरोपी आणि मयत दोघेही एकाच ठिकाणी राहत होते. विशेष म्हणजे सोबत कामावर जाण्यासाठी त्यांनी एक मोटरसायकल देखील घेतली होती. मात्र, याच काळात उमेशचा आपल्या पत्नीसोबत नैतिक संबंधाचा संशय दत्ता कराळेला होता. त्यामुळे एका दिवशी त्याने दोघांनी विकत घेतलेली मोटारसायकल परत विकून टाकली. दरम्यान याबाबत विचारणा करण्यासाठी उमेश दत्ता याच्या घरी गेला होता. मात्र, 'तू पैसे मागण्यासाठी आला नसून, तुझे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहे. त्यामुळेच तू माझ्या पत्नीला भेटायला आला.' असे म्हणत दत्ता घरात गेला. घरातून पेट्रोलची बाटली आणून उमेश याच्या अंगावर ओतून काडीने त्याला पेटवून दिले. ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.
एकूण 9 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या...
दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान उमेश याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात साक्षीपुराव्यादरम्यान एकूण 9 साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आली. त्यात मयत उमेश दिवेकर, डॉ. संतोष मोरे, डॉ. संदिप चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल कासारले व तपासी अमलदार आर. एस. पवार यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. तर आरोपीतर्फे त्याच्या पत्नीची साक्ष नोंदविली गेली. दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम माहियोद्यीन एम.ए. यांनी आरोपी दत्ता कराळे यास कलम 302 अन्वये जन्मठेप व 2 हजार रुपये दंड व न भरल्यास दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. नानासाहेब जगताप यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सचिन खरात यांनी त्यांना सहकार्य केले.
दोघांनी मिळून कामावर जाण्यासाठी मोटारसायकल घेतली होती...
या घटनेतील मयत उमेश नामदेव दिवेकर हे सन 2019 मध्ये पंढरपूर येथे मजुरी करून उपजीविका भागवत होते. पाच महिन्यांपूर्वी त्याची ओळख आरोपी दत्ता कराळे याच्यासोबत झाली. तर, दत्ता देखील त्याच्या पत्नी व मुलांसह पंढरपूर येथे वास्तव्यास होता. विशेष म्हणजे, उमेश व दत्ता हे दोघेही एका ठिकाणी कामाला जात असे. या काळात दोघांनी मिळून कामावर जाण्यासाठी साडेतीन हजार रुपये किंमतीची एक जुनी मोटारसायकल विकत घेतली होती. यासाठी 3 हजार रुपये हे उमेश याने तर उर्वरीत पाचशे रुपये हे दत्ता याने दिले होते. मोटारसायकलची किंमत दोघांनी समसमान देण्याचे ठरविले होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! बलात्कारानंतर पिडीत तरुणीने घेतले विष, तर आरोपीकडून गळफास घेऊन आत्महत्या