Chhattrapati Sambhajinagar Crime: बायकोला म्हणाला तासाभरात घरी येतो अन्... छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध उद्योजकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ
Chhattrapati Sambhajinagar News: पत्नीला 'मी तासाभरात घरी पोहोचतो' असे फोन करून सांगितल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृतदेह आढळला, या घटनेनं संभाजीनगर हादरलं.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दौलताबाद धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी नाक्याजवळील पुलाखाली एका उद्योजकाचा मृतदेह आढळून आला. सागर रामभाऊ परळकर असे या उद्योजकाचे नाव आहे. पत्नीला 'मी तासाभरात घरी पोहोचतो' असे फोन करून सांगितल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृतदेह आढळला, या घटनेनं संभाजीनगर हादरलं. हा अपघात की घातपात यावर संशय व्यक्त केला जात आहे, सागर परळकर हे वाळूज एमआयडीसीतील पुष्पक ऍग्रो कंपनीचे संचालक आहेत.
धुळे - सोलापूर महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळील पुलाखाली उद्योजक सागर रामभाऊ परळकर यांचा मृतदेह आढळून आला. काल (सोमवारी) दुपारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. रविवारी ते दुचाकीने कन्नडला गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. सोमवारी सायंकाळी करोडी टोल नाक्याजवळ पुलाखाली मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळील मोबाइल व आधार कार्डवरून सागर यांची ओळख पटली. तेथेच त्यांची दुचाकी तुटलेली सापडली. कुटुंबियांना कळवून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठवण्यात आला.
वाळूजमध्ये अॅग्रो कंपनीचे संचालक
मिळालेल्या माहितीनुसार, मूळ पैठणचे असलेले सागर कुटुंबासह कांचनवाडीत वास्तव्यास होते. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांची भागीदारीत पुष्पक अॅग्रो कंपनी असून ते संचालक होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. रविवारी दुपारी ते कंपनीच्या कामासाठी दुचाकीने कन्नडला गेले होते. रात्री 9 वाजता त्यांचा पत्नीसोबत शेवटचा संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी 'मी हतनूरजवळ आहे. तासाभरात येतो', असे सांगितले. मात्र, त्यानंतर कुटुंबाचा त्यांच्याशी संपर्कच झाला नाही. मध्यरात्रीतून हवालदिल झालेल्या सागर यांच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह करोडी टोलनाक्यानजीक पुलाखाली आढळून आला.
अपघात की घातपात? परिसरात सर्वत्र चर्चा
परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली. मात्र, हा अपघात आहे की घातपात आहे, याचा तपास पोलिस करत आहेत, त्याचबरोबर परिसरात देखील याबाबतची चर्चा रंगली आहे.

























