(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO Sharad Pawar : भाजप नेते म्हणतात, अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे; शरद पवार म्हणाले 'तो' दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय
Sharad Pawar On Amit Shah : विधानसभेच्या निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना एकत्र करणार असून प्रमुख पक्षांशिवाय इतर पक्षांनाही काही जागा सोडणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर : अमित शाहांवर (Amit Shah) टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) केलेल्या टीकेला आता पवारांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तो दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे असा टोला पवारांनी लगावला. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसात राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातून अमित शाहांनी पवारांचा उल्लेख भ्रष्टाचाराचे सरदार असा केला होता. त्यानंतर शरद पवारांनीही तडीपार नेते असं म्हणत उत्तर दिलं होतं. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर टीका करत अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे असं म्हटलं होतं.
भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, आम्ही तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय.
केंद्रातील सरकार पडणार का?
केंद्रातील सरकार पडणार का असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की, केंद्रातील सरकार पडणार की नाही मला माहीत नाही, जोपर्यंत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू मोदींसोबत आहेत तोपर्यंत सरकारला अडचण नाही. आधी सत्ता मोदींच्या हातात होती आता त्यात वाटेकरी आले आहेत.
राज्यातल बदल व्हावा अशी इच्छा राज्यातील जनतेची असल्याचं सांगत शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काही भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्हाला संविधान बदल करण्यासाठी 400 जागा हव्या आहे. आता विधानसभा निवडणुका आहे, यात लोकांना वाटत आहे की राज्यात आता बदल हवा आहे.
विधानसभेला सर्वांना एकत्रित घेणार
शरद पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला समोर जाताना महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढण्याची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वजण एकत्र आले तर ठीक, अन्यथा त्याची किंमत मोजावी लागेल. तीन दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली, यावेळी संजय राऊत, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात यांनी जागावाटप चर्चेसाठी होणाऱ्या कमिटीचे नावं दिले. प्रमुख पक्षासोबत डाव्या पक्षांना सोबत घ्यावे आणि त्यांना काही जागा द्याव्यात असे मी सूचवलं आहे.
राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून बोलताना शरद पवार म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत काहीच नाही, निवडणुकीपूर्वी एखादा दुसरा हप्ता देण्याचा निर्णय होईल. यापूर्वी सत्ता असताना का निर्णय घेतले का नाही?
येणाऱ्यांना सरसकट घेणार नाही
अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा पक्षात घेणार का असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, अनेकांना वाटत आहे रस्ता चुकला आहे, त्यामुळे परत यावा असे वाटत असेल. काही लोकांनी पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याबद्दल सरसकट निर्णय घेण्याची मानसिकता आमची नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली त्यांच्याबाबत विचार करण्याचे सुरू आहे
आरक्षणावर काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, जरांगे आणि ओबीसी नेते यांना एकत्र बोलवा, आमच्यासारख्या लोकांना बोलावून प्रश्न सोडवावा. काही लोकांचे मत आहे आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या वरती पाहिजे. आरक्षणाच्या प्रश्नी चर्चा केली पाहिजे. मराठा आरक्षणावर अनेकदा बोललो आहे. काही गोष्टी अशा आहेत की मला काळजी वाटत आहे. लोकांमध्ये अंतर वाढत आहे का अशी स्थिती आहे. मराठवाड्यातील काही दोन तीन जिल्ह्यात अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एका जातीचा व्यक्ती दुसऱ्या जातीच्या व्यक्तीकडे जात नसेल तर गंभीर आहे. नामांतरनंतर त्याचे परिणाम मराठवाड्यात पाहायला मिळाले होते. माझी ती चूक होती, मी मुंबईमध्ये बसून तो निर्णय घेतला होता. आता मराठवाड्यात निर्माण झालेली परिस्थिती सर्वांनी सोडवली पाहिजे.