माफियाराज संपणार! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 'या' सात ठिकाणी सुरू होणार वाळू डेपो
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात ठिकाणी वाळू डेपो सुरू केले जाणार आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar News: वाळूच्या अवैध वाहतुकीसह (Illegal Sand Transport) तस्कारीला आळा घालण्यासाठी सरकारने नव्या वाळू धोरणाची घोषणा केली आहे. त्यामुळे नागरिकांना बांधकामासाठी लागणारी वाळू (Sand) आता थेट अधिकृत डेपोवरून विकत घेता येणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) अशा सात ठिकाणी वाळू डेपो सुरू केले जाणार आहे. तर त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाद्वारे निविदादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 18 वाळू घाटातून वाळू उपसा करून, सात वेगवेगळ्या डेपोंमध्ये जमा केली जाणार आहे. तर याच डेपोमधून नागरिकांना 600 रुपये ब्रास प्रमाणे वाळू विकत घेता येणार आहे. तर यासाठी 5 मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा (Sand Mafia) हैदोस पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाळूच्या किमंती गगनाला जाऊन भिडल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना घर बांधकाम करणं अवघड झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये सर्वांचेच हितसंबंध असल्याने तस्कारी रोखणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हा माफियाराज रोखण्यासाठी आणि नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी यावर्षी शासनाने नवे वाळूचे धोरण आणले आहे. त्यानुसार आता वाळू घाटांचे लिलाव रद्द करून वाळू डेपो तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तर यावर्षी जिल्ह्यातील 21 वाळू घाटांना राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली होती. परंतु त्यातील तीन वाळूघाट पाणी पुरवठा योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे 18 वाळू घाट उपशासाठी तयार आहेत. तर नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात पैठण तालुक्यात पैठणवाडी, सिल्लोड तालुक्यातील मोढा, वैजापूर तालुक्यातील झोलेगाव, डाग पिंपळगाव, फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी आणि सिल्लोड तालुक्यातील बोरगाव कासारी या 7 ठिकाणी वाळू घाट तयार करण्यात येणार आहे.
अशी असणार नवीन वाळू धोरण प्रकिया
- विविध ठिकाणच्या 18 वाळू घाटातून वाळू उपसा करून या डेपोमध्ये जमा केली जाणार आहे.
- या सात डेपोत 89 हजार 920ब्रास वाळू जमा केली जाणार आहे.
- ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर या डेपोतून 600 रुपये ब्रासने खरेदी करता येणार आहे.
- डेपोतून 600 रुपये ब्रासने जरी वाळू खरेदी करता येत असली तरी डेपोतून वाळू नेण्याचा खर्च नागरिकांना स्वतः करावा लागणार आहे.
- मात्र त्यासाठी वाहतुकीचे दर जिल्हा प्रशासन निश्चित करणार आहे.
- डेपो तयार करणे, वाळू घाटातून वाळू उपसा करणे, वाळूची वाहतूक करून ती डेपोत जमा करणे आणि नागरिकांनी निश्चित तयार विक्री करणे यासाठी प्रशासनाने 28 एप्रिल रोजीच निविदा प्रसिद्ध केली आहे.
- तर यासाठी 5 मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: