तब्बल एक लाख बुंदीचे लाडू! संभाजीनगरच्या फुलंब्रीतील रामभक्त गावागावात वाटणार प्रसाद
Ram Mandir Inauguration : उद्या म्हणजेच 22 जानेवारीला फुलंब्री तालुक्यातील सर्वच गावात बुंदीचे लाडू वाटप केले जाणार आहे. यासाठी तब्बल एक लाख एक हजार बुंदीचे लाडू तयार केले जात आहे.
छत्रपती संभाजीनगर (फुलंब्री) : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या (Ayodhya Ram Mandir Inauguration) पार्श्वभूमीवर देशभरात आनंदाचे वातावरण असून, प्रत्येक रामभक्त वेगवेगळ्या पद्धतीने या सोहळ्यात सहभागी होत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यात देखील असाच काही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील राम भक्तांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच 22 जानेवारीला फुलंब्री तालुक्यातील सर्वच गावात बुंदीचे लाडू वाटप केले जाणार आहे. यासाठी तब्बल एक लाख एक हजार बुंदीचे लाडू तयार केले जात आहे.
अयोध्यामध्ये उद्या होत असलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने फुलंब्री शहारासह ग्रामीण भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. दरम्यान, फुलंब्री तालुक्यातील प्रत्येक गावात बुंदीच्या लाडूचे वाटप होणार आहे. राम लाल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राम भक्तांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. यासाठी गेल्या दोन तीन दिवसांपासून फुलंब्री शहरात लाडू तयार केले जात आहे. गेल्या दोन दिवसांत 1 लाख लाडू तयार करण्यात आले आहेत. तसेच उद्या प्रत्येक गावात प्रसाद म्हणून वाटप करण्यासाठी या लाडूंची पॅकिंग जात आहे. यासाठी वेगवेगळ्या लोकांवर जबादारी देण्यात आली आहे.
लाडू बनवण्यासाठी शेकडो हात लागले कामाला...
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने फुलंब्री तालुक्यात एक लाख लाडू वाटप केले जाणार आहे. त्यामुळे हे लाडू बनवण्यासाठी शेकडो हात कामाला लागले आहेत. लाडू बनवण्यासाठी अनेक आचारी बोलावण्यात आले आहेत. तर, मोठमोठ्या कढाई, चूल आणण्यात आले आहेत. सोबतच अनेक महिला लाडू बनवण्यासाठी कष्ट घेत आहेत.
भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी भेट दिली
दरम्यान, फुलंब्री तालुक्यात ज्या ठिकाणी एक लाख लाडू तयार करण्यात येत आहे त्याठिकाणी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी भेट दिली आहे. विशेष म्हणजे खुद्द बागडे यांनी देखील या कार्यात सहभाग नोंदवत आपल्या हाताने लाडू तयार केले. यावेळी परिसरातील गावकरी आणि भाजपचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते.
109 कुंडात्मक महायागचे आयोजन
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर शहरातील छत्रपती संभाजी राजे क्रीडा संकुल येथे 109 कुंडात्मक महायागचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री अतुल सावे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आयोध्या येथे श्री राम यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशात हा 109 कुंडात्मक महायागचे आयोजन करण्यात आले आहे. यात 108 कुंड आणि एक प्रधान श्रीराम कुंड असे एकूण 109 कुंडात्मक महायाग होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
109 कुंडात्मक महायाग, 196 मंदिरांत प्राणप्रतिष्ठा सोहळा; 'राम उत्साहा'साठी संभाजीनगर सज्ज