25 हजार लोकांच्या जेवणाची सोय, मुख्यमंत्र्यांसह बडे नेत्यांची हजेरी; अब्दुल सत्तारांच्या मुलाचा शाही विवाह
Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवरील आयकॉन लॉनवर हा विवाह सोहळा होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या घरात लग्नकार्य पाहायला मिळत असून, आज त्यांच्या मुलाचे लग्न आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील एका लॉनवर सायंकाळी 6 वाजता हा विवाह सोह्ळा पार पडत आहे. अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा हा विवाह सोहळा होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह बडे नेत्यांची हजेरी पाहायला मिळणार आहे.
अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव अमेर सत्तार यांचा विवाह नाशिकच्या येवला येथील अहमद शेख यांची कन्या हुमा नाज शेख यांच्यासोबत होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपासवरील आयकॉन लॉनवर हा विवाह सोहळा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता विवाह सोहळा पार पडणार आहे. या विवाहाची शाही तयारी करण्यात आली आहे. यावेळी तब्बल 25000 लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
यांची असणार उपस्थिती?
अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या लग्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, शुंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
आज न येणारे पाहुणे रिसेप्शनला येतील...
दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी 25000 लोकांच्या जेवणाची सोय केली असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलय. आपल्या घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने साधारण, पण चांगल्या पद्धतीने आपण करत आहोत. मात्र, यावर विरोधकांनीं शिव्या (टीका) दिल्या तरीही आपण आहेर म्हणून स्वीकारू असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. याशिवाय आज या विवाह सोहळ्याला उपस्थित न राहू शकलेल्या मंत्री आणि नेत्यांचा वलीमा अर्थात रिसेप्शनचा 21 तारखेचा सिल्लोड येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या, रिसेप्शनला उपमुख्यमंत्री अजीत पवार, खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती राहणार असल्याचे देखील सत्तार यांनी म्हटले आहे.
पोलिसांचे विशेष बंदोबस्त...
मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा आज विवाह सोहळा पार पडतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवरील एका लॉनवर हा विवाह सोहळा होणार आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. सोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक व्हीआयपी देखील या लग्न सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पोलिसांकडून विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. लग्न सोहळ्यात येणाऱ्या लोकांची संख्या जास्त असल्याने, वाहतूक कोंडी होऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. विशेष म्हणजे, शहरातील शिवाजीनगर रेल्वे ब्रिजचे काम सुरू असल्याने संध्याकाळी बीड बायपासवर वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा फटका लग्नाला येणाऱ्या मंत्री आणि व्हीआयपी पाहुण्यांना बसू नयेत यासाठी वाहतूक पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: