Pankaja Munde: 'त्या' प्रकरणातील गुन्ह्यासह दोषारोपपत्र रद्दसाठी पंकजा मुंडेंची खंडपीठात धाव
Court News : पंकजा मुंडे यांच्या अर्जानंतर न्यायालयाने प्रतिवादी राज्य शासन आणि तक्रारदार पोलिस कर्मचारी यांना नोटीस पाठवली आहे.
Court News : कोरोना काळात प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याबाबत दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करणारा विनंती फौजदारी अर्ज भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलाय. कोरोनाकाळात किमान 50 लोकांसह ऑनलाइन पारंपरिक दसरा मेळावा घेण्यासाठी 25 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजकांनी प्रशासनाकडे परवानगी मागीतली होती. मात्र बीड जिल्ह्यात त्यावेळी प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्यामुळे पाटोद्याच्या तहसीलदारांनी केवळ 5 लोकांच्या उपस्थितीतच मेळावा घेण्याची परवानगी दिली होती. मात्र ऐनवेळी जास्त गर्दी झाल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता हाच गुन्हा रद्द करण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी न्यायालयात केली आहे. त्यानंतर प्रतिवादी राज्य शासन आणि तक्रारदार पोलिस कर्मचारी यांना न्यायालयाने नोटीस पाठवली आहे.
काय आहे प्रकरण?
संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेले सावरगाव घाट म्हणजेच भगवान भक्तिगडावर दरवर्षी पंकजा मुंडे यांच्या उपस्थित दसरा मेळावा आयोजित करण्यात येतो. दरम्यान ऑक्टोबर 2020 मध्ये राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे सर्वच सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास निर्बंध घालण्यात आले होते. दरम्यान यावेळी 50 लोकांसह पारंपरिक ‘ऑनलाइन’ दसरा मेळावा घेण्यासाठी आयोजकांनी 25 ऑक्टोबर 2020 रोजी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्यामुळे पाटोद्याच्या तहसीलदारांनी केवळ 5 लोकांच्या उपस्थितीतच दसरा मेळाव्याची परवानगी दिली.
तर पाच लोकांनाच परवानगी दिली असताना भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार भागवत कराड, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार मोनिका राजळे, आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार श्रीराम धोंडे, जि. प. सदस्या सविता गोल्हार, मेळाव्याचे आयोजक संदेश सानप, सावरगाव घाटचे सरपंच रामचंद्र सानप यांच्यासह 40 ते 50 जणांनी प्रतिबंधात्मक आदेश, कोरोनाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याची तक्रार पोलीस कर्मचाऱ्याने दिली होती. त्यावरून पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पाटोदा न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांना अधिकारच नाहीत
कोरोना काळात प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याबाबत दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करणारा विनंती फौजदारी अर्ज भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केला आहे. दरम्यान बुधवारी अर्जाच्या सुनावणीवेळी ॲड. चाटे यांनी खंडपीठासमोर आपली बाजू मांडताना, संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा व तपास करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. भादंवि कलम 195(1) व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 60 नुसार ज्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाला असे म्हणणे आहे. त्यांनी स्वत: न्यायालयात तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे बाजू ॲड. चाटे यांनी मांडली.
इतर महत्वाच्या बातम्या: