G20 परिषदेसाठी लावलेल्या कुंड्यांची छत्रपती संभाजीनगरात चोरी, फोटो आले समोर
Chhatrapati Sambhajinagar: उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: जी-20 परिषदेच्या (G-20 Conference) निमित्ताने देशातील अनेक महत्वाच्या शहरांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. असे असताना हरियाणातील गुरुग्राममध्ये प्रशासनाने रस्त्यावर लावलले रोपटे नागरिक चोरुन नेत असल्याची घटना समोर आली होती. दरम्यान आता असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhajinagar City) घडताना पाहायला मिळत आहे. विदेशी पाहुण्यांच्या आगमनानिमित्ताने रस्त्यांवर लावण्यात आलेल्या कुंड्या गायब होण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत शंभराहून अधिक कुंड्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. तर अशाच काही कुंड्या घेऊन जाणाऱ्या महिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात दुचाकीवर आलेली महिला रस्त्यावर ठेवलेल्या कुड्या घेऊन जाताना पाहायला मिळत आहे.
G-20 साठी विदेशी पाहुणे शहरात येणार असल्याने प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन शहराचा चेहरामोहरा बदलला. शहर सुंदर दिसावे म्हणून, शहरातील सर्वच प्रमुख ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले. तर विमानतळ, क्रांतीचौक, जालना रोड, हॉटेल ताज, बारापुल्ला गेट आदी भागातून शोभीवंत झाडांच्या मोठ्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र G-20 परिषदेची बैठक संपताच आता या कुंड्या गायब होत आहेत. दुभाजकांमध्ये लावलेली फुलांची झाडेही नागरिक उपटून नेत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मनपाला जी भीती होती तेच सध्या घडताना पाहायला मिळत आहे.
कुंड्या घेऊन जातानाचे फोटो आले समोर...
रस्त्याच्या चौकात लावण्यात आलेल्या शोभीवंत झाडांच्या कुंड्या आणि झाडं नागरिक घेऊन जात असल्याचे समोर येत आहे. दरम्यान अशात एका महिलेचा झाडे उपटून घेऊन जातानाचा फोटो समोर आले आहे. दुचाकीवर आपल्या मुलीसह आलेल्या या महिलेने गाडी थांबवली. त्यानंतर प्रशासनाने लावलेल्या शोभीवंत झाडे उपटून आपल्या गाडीवर ठेवून त्या निघून गेल्याचे पाहायला मिळाले. तर यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
प्रसंगी गुन्हा दाखल करणार
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ, क्रांतीचौक, जालना रोड, हॉटेल ताज, बारापुल्ला गेट आदी भागातून शोभीवंत झाडांच्या मोठ्या कुंड्या गायब होत असल्याचे समोर आले आहेत. दुभाजकांमध्ये लावलेली फुलांची झाडेही नागरिक उपटून नेत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता अशा नागरिकांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. तर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रसंगी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: