वेरुळ-अजिंठा महोत्सव! दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरवासियांना मिळाली संगीताची मेजवानी
Chhatrapati Sambhajinagar: वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवातून सलग दुसऱ्या दिवशी संगीत प्रेमींना संगीताची मेजवानी मिळाली.
Chhatrapati Sambhajinagar: वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव (Ellora Ajanta International Festival 2023) समिती, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सुवर्ण झळाळी लाभलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील सोनेरी महालाच्या प्रांगणात हा तीन दिवसीय महोत्सव होत आहे. दरम्यान वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवातून सलग दुसऱ्या दिवशी संगीतप्रेमींना संगीताची मेजवानी मिळाली.
छत्रपती संभाजीनगर शहरात सात वर्षानंतर वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव होत आहे. दरम्यान यानिमित्ताने सलग दुसऱ्या दिवशी संगीतप्रेमींना संगीताची मेजवानी मिळाली. उस्ताद सुजाद हुसेन खान यांचे सतार वादन आणि गायनाला मायबाप रसिकांनी भरभरुन दाद दिली. तर ताल वाद्याचे जादूगार पद्मश्री शिवमणी यांच्या वादनाने रसिकांना खिळवून ठेवले. शेवटी ताल वाद्याचे जादूगार पद्मश्री शिवमणी तसेच अदिती भागवत यांच्या लावणीने संगीत मैफिलीचा समारोप झाला.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालय व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवास शनिवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महलमध्ये प्रारंभ झाला. रविवारी (26 फेब्रुवारी) पहिल्या सत्रामध्ये उस्ताद सुजाद हुसेन यांनी यमन कल्याण रागाने सतार वादनाला प्रारंभ केला. रसिकांनी उस्फूर्त दाद दिली. सतार वादनानंतर त्यांनी काही गजल सादर करुन रसिकांची मने जिंकली. मेरे हिस्से से कोई नही या गझलला तर रसिक प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. सितार वादन आणि गायनातील त्यांनी आपली हुकूमत दाखवून दिली त्यांना तबल्यावर अमित चौबे आणि पंडित मुकेश जाधव यांनी सुरेख साथ दिली.
रसिकांची वाह वाह
दुसऱ्या सत्रामध्ये ताल वाद्याचे जादूगर पद्मश्री शिवमणी यांनी एकाच वेळी विविध प्रकारचे वाद्य वाजवून रसिकांची वाह वाह मिळवली. त्यांना सतार वादक रवी चारी, गिटार वादक सेल्देन डी सिल्वा, खंजिरा वादक सेल्व गणेश आणि सितार वादक संगीत हळदीपूर यांनी साथ संगत केली. अदिती भागवत यांच्या कथक नृत्याने तर या संगीत मैफिलीला चार चांद लावले. यावेळी लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना पोलीस आयुक्त निखिल गुप्ता आदी उपस्थित होते.
तब्बल सात वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महोत्सव
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने ती ओळख अधिक दृढ करण्यासाठी 1985 पासून वेरुळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात येत असतो. परंतु मागील काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे महोत्सव होऊ शकला नाही. मात्र यंदा हा महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार यंदा 25, 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी सोनेरी महाल येथे जागतिक दर्जाच्या सुप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत आहे.
संबंधित बातम्या:
दिमाखदार सोहळ्यात वेरूळ- अजिंठा महोत्सवास सुरुवात; कथ्थक, भरतनाट्यम आणि लावणीने रसिक मंत्रमुग्ध