छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत, नागरिकांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना
Chhatrapati Sambhaji Nagar : जायकवाडी धरणातील महापालिकेच्या पंपगृहास विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या यंत्रणेत सोमवारी बिघाड झाला होता.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील पाणी प्रश्न (Water Issues) काही सुटता सुटत नाही. त्यातच सतत महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा (Water Supply) करणाऱ्या यंत्रणेतील बिघाडामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशात आता पुन्हा एकदा जायकवाडी धरणातील महापालिकेच्या पंपगृहास विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या यंत्रणेत सोमवारी बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पाणीउपसा करणारे पंपदेखील जॅम झाले होते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात व पंपांची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल साडेपाच तासांचा अवधी लागला असून, या कालावधीत शहराचा पाणीउपसा पूर्णपणे बंद होता. आता याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार असून, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
मार्च महिना संपत आला असून, उन्हाचे चटके अधिक जाणवत आहे. त्यामुळे शहरातील पाण्याची मागणी देखील वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र अशात आहे तो पाणीपुरवठा देखील सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान सोमवारी जायकवाडी धरणातील महापालिकेच्या पंपगृहास विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या यंत्रणेत सतत बिघाड होत होते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात व पंपांची दुरुस्ती करण्यासाठी तब्बल साडेपाच तासांचा काळ लागला. यामुळे याचे परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला असून संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याची गरज आहे.
अनेक भागात उशिरा पाणीपुरवठा...
जायकवाडी धरणातील महापालिकेच्या पंपगृहास विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती महावितरणच्या अभियंत्यांना देण्यात आली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर फीडरवरील वीजपुरवठा खंडित करून तो जालना पाणीपुरवठा योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या फीडरवर जोडण्यात आला. त्यानंतर सकाळी 7वाजून 40 मिनिटांनी कर्मचाऱ्यांनी पंपगृह चालू करताच पाण्याच्या दाबामुळे सहाव्या क्रमांकाचा पंप निखळला. तर पाचव्या क्रमांकाचा पंप पूर्णपणे जाम झाला होता. त्यामुळे दुरुस्तीच्या काळात जुनी योजना 4 तास 55 मिनिटे बंद होती. तर नवीन योजनेवरील पाणीउपसा 5 तास 25 मिनिटे बंद होता. त्यामुळे शहराकडे येणारे पाणी पूर्णपणे थांबलेले होते. यामुळे दुपारनंतर शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पे पूर्ण होऊ शकले नाहीत. काही भागांना पाच तास उशिराने पाणी मिळाले. पाणी वितरणाचे काही टप्पे एक दिवसाने पुढे ढकलल्याचे महापालिकेने कळवले आहे.
सतत पाणीपुरवठा विस्कळीत...
गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महानगरपालिकेच्या यंत्रणेत सतत तांत्रिक बिघाड होत आहे. तर दोन्ही पाणीपुरवठा योजना जुन्या झाल्याने अनेकदा जलवाहिनी फुटत असल्याचे पाहायला मिळतात. त्यामुळे याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता उन्हाळा सुरु झाल्याने अशीच परिस्थिती राहिल्यास यंदा देखील शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :