Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या राड्यात पोलिसांचा सहभाग?; इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप
Chhatrapati Sambhaji Nagar : या संपूर्ण घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जलील यांनी केली आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) किराडपुरा भागात दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर हिंसाचारात झाले. 29 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiyaz Jaleel) यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. रामनवमीच्या सणाच्या आदल्या रात्री शहरातील किराडपुरा भागात दुर्देवी घटना घडली ज्यामध्ये पोलिसांच्या (Police) गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांच्या भूमिकेवर किंवा हिंसाचाराच्या ठिकाणी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचं, जलील म्हणाले आहे. तर या संपूर्ण घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावे, अशी मागणी करणारे पत्र जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांना पाठवले आहे.
पोलीस कुठे गेले होते?
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री मोदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "ज्या ठिकाणी वाद झाला त्या ठिकाणी मी स्वतः मंदिरात दोन तासांहून अधिक काळ उपस्थित होतो. परंतु या ठिकाणी फक्त 15 पोलीस यावेळी होते. विशेष म्हणजे या पोलिसांना केवळ मंदिराचे रक्षण करणार्यांपासूनच नव्हे तर दगडफेक करणार्या आणि वाहनांची जाळपोळ करणार्या लोकांच्या गर्दीला तोंड देण्याचे काम सोपवण्यात आले होते. तर या राड्यात 13 वाहने जळाली असून त्यातील बहुतांश मोठमोठ्या पोलीस व्हॅन होत्या. त्यामुळे समाजकंटकांना हिंसाचार करण्यास मोकळे का सोडण्यात आले? आणि त्या रात्री पोलिसांच्या 13 गाड्या जाळण्यात आल्या, तेव्हा पोलीस कुठे गेले होते? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे.
निवृत्त न्यायाधीशांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करावी...
पुढे बोलताना जलील म्हणाले की, "माझ्या मनात अशी शंका निर्माण केली आहे की या षडयंत्रामागे कोणीही असोत आणि त्या कोणाच्याही हातून नियोजित आणि अंमलात आणल्या गेल्या होत्या याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की, महाराष्ट्र सरकारला उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत." "या घटनेमुळे देशात मोठा अनर्थ घडला असता, सत्य बाहेर येण्याची गरज आहे," असे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या :