Chhatrapati Sambhaji Nagar News: काय सांगता! अर्ध्या गावाला अतिक्रमणाच्या नोटिसा, 186 कुटुंबांवर घर खाली करण्याची वेळ
Chhatrapati Sambhaji Nagar : विशेष म्हणजे नोटीस देण्यात आलेल्या गटामध्ये जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीसुद्धा आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या हालचाली राज्यभरात सुरु असून, आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लाखो अतिक्रमणधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar Distric) पैठण तालुक्यातील अतिक्रमणधारकांना देखील अशाच नोटीसा देण्यात आल्या आहेत. पण याचवेळी पैठणखेडा या गावातील चक्क अर्ध्या गावाला शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कारण या जागांवर तब्बल 186 कुटुंबांचे घर बांधलेली आहे. ज्यात अनेक घरं शासकीय घरकुल योजनेमधून बांधण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे याच गटामध्ये जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय व अंगणवाडीसुद्धा आहे.
पैठणखेडा येथील अर्ध्या गावाला अतिक्रमणाच्या नोटिसा आल्यामुळे येथे राहत असलेल्या 186 रहिवासी कुटुंबांचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावालगतच असलेल्या गायरान गट क्र. 11 व 12 मध्ये राहणाऱ्या लोकांना ही नोटीस आली आहे. थेट अर्ध्या गावाला नोटीस आल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना विविध शासकीय बेघर, 1957 ते 1985 दरम्यान शासनानेच भूमिहीन, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय योजनेअंतर्गत समाजकल्याण विभाग, इंदिरा गांधी झोपडपट्टी व इंदिरा आवास योजनेअंतर्गत गावालगतच असलेल्या याच गायरान जमिनीवर जागा देण्यात आली होती असा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या ठिकाणी गेली दोन पिढ्यांपासून नागरिक राहत आहे. पण आजवर या नागरिकांनी जागा दिल्याचा ना पुरावा मागितला ना तहसील कार्यालयानेही दिला. तहसीलमार्फत या नागरिकांना वैयक्तिक कठलेही जागेचे प्रमाणपत्र दिले नाही. परंतु, ग्रामपंचायतीमधील नोंदीनुसार तहसीलच्या आदेशानुसार या नागरिकांच्या घरांची नोंद 8 अ वर इतर अधिकार (भोगवटा) मध्ये घेण्यात आल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.
शासकीय योजनेतून घरे बांधलेली...
याच ठिकाणी मागासवर्गीय कुटुंबाला शासनाने समाजकल्याण विभागांतर्गत 1962 मध्ये घरकुल बांधून दिल्याच नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तर, तर काही लोकांना 1957/76 मध्ये इंदिरा गांधी झोपडपट्टी योजनेअंतर्गत याच गटांत जागा, पत्रे, लाकडी खांब व बांधकामासाठी आर्थिक अनुदान दिले. इंदिरा आवास योजनेंतर्गत घरे बांधून या घरकुलाचे लोकार्पण तत्कालीन गृहराज्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते.पण आता या लोकांना थेट नोटीसा मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
नोटीस रद्द करण्याची मागणी...
पैठणखेडा गावालगतच असलेल्या गायरान गट क्र. 11 व 12 मध्ये राहणाऱ्या लोकांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस देण्यात आली आहे. मात्र आज येथे राहत असलेल्या लोकांची दुसरी पिढी सुरू असून, कमवणारे हात वाढल्यामुळे आर्थिक परिस्थितीनुसार येथे आज सिमेंट काँक्रिटची पक्के घरे झाली आहे. शासकीय योजनेअंतर्गत येथील नागरिकांना रस्ते, पिण्याचे पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून आनंदाने राहत असलेल्या या लोकांना शासनाने पुन्हा बेघर करण्याच्या नोटिसा दिल्यामुळे येथील रहिवाशांची धडधड वाढली आहे. दिलेली नोटीस रद्द करून येथे राहत असलेल्या नागरिकांची घरे नियमित करावे, अशी मागणी या भागात राहणाऱ्या नागरिकांनी तहसीदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed News : गायरान अतिक्रमण प्रकरण तापणार; आष्टी तालुक्यातील साडेतीन हजार अतिक्रमणधारकांना नोटीस