(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'तुम्हीच आमचे मायबाप', शेतकऱ्याने केंद्रीय पथकाचे थेट पाय धरले; वाचा नेमकं काय घडलं
Chhatrapati Sambhaji Nagar : आपल्या भावना अधिकाऱ्यांना सांगतांना विजय सोनवणे नावाचे शेतकरी भावूक झाले आणि त्यांनी थेट अधिकाऱ्याचे पाय धरून तुम्हीच आमचे मायबाप असल्याचे म्हणत आपले दुःख मांडले.
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या (Drought) पाहणीसाठी केंद्राचे दोन पथक आज मराठवाड्याच्या (Marathwada) दौऱ्यावर आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) सोयगाव तालुक्यातल्या धनवट गावात या पथकाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, शेतात पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकातील (Central Team) अधिकाऱ्याचे एका शेतकऱ्याने थेट पाय धरून आपल्या भावना मोकळ्या केल्या. पाण्याअभावी पीकं कोमेजून गेली, यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. त्यामुळे, आपल्या भावना अधिकाऱ्यांना सांगतांना विजय सोनवणे नावाचे शेतकरी भावूक झाले आणि त्यांनी थेट अधिकाऱ्याचे पाय धरून तुम्हीच आमचे मायबाप असल्याचे म्हणत आपले दु;ख मांडले.
मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तर, केंद्र आणि राज्य सरकराने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ओत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राचे पथक मराठवाड्यासह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पाहणी दौरा करत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या अनेक गावात जाऊन या पथकाने पाहणी केली. यावेळी सोयगाव तालुक्यातल्या धनवट गावात पोहचल्यावर विजय सोनवणे नावाच्या शेतकऱ्याने या पथकातील अधिकाऱ्याचे थेट पाय धरले.
शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या...
मराठवाड्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाकडून छत्रपती संभाजीनगरमधल्या सोयगाव तालुक्यातील जंगला तांडा गावात दुष्काळी भागाची पाहणी करण्यात आली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दुष्काळग्रस्त भागात थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. दरम्यान, यावेळी दोन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी जंगला तांडा येथील शेतकरी सुकलाल राठोड यांच्या शेतात जाऊन कपाशी आणि तुर या पिकांची पाहणी केली. तसेच, त्यांच्यासोबत संवाद साधत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शिवाय कपाशी, मक्का यासह अनेक पिकांचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात आला. तर, दुष्काळामुळे उत्पादन घटले त्यामुळे आम्हाला सरकारने तात्काळ आर्थिक स्वरूपात मदत द्यावी अशी मागणी सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकाकडे केली.
धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळ पाहणीसाठी पथक पोहचले...
छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच केंद्राचे पथक धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील दुष्काळ पाहणीसाठी शेतकऱ्याच्या बांधावर दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. तीन सदस्यीय पथक जिल्ह्याचा मॅरेथॉन दौरा करून अकरा गावांना भेट देणार आहे. पिकांची परिस्थिती, पाण्याअभावी रखडलेली पेरणी, चारा व पाणी टंचाईचा आढावा घेऊन पथकाने शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, धाराशिव जिल्ह्यात तीन तालुक्यांसह, 27 मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. याच पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील ताकविकी येथे केंद्रीय पथकाने भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
केंद्रीय पथकाकडून आजपासून मराठवाडा, उ.महाराष्ट्राचा दौरा; दुष्काळाची करणार पाहणी