(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Update : ऐन दिवाळीच्या तोंडावर संभाजीनगरात कोरोनाची एन्ट्री; चार वर्षीय चिमुकली पॉझिटिव्ह
Corona Update : वर्षभरानंतर शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने मनपा आरोग्य यंत्रणाही हादरली आहे.
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असतांना दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात चार वर्षीय चिमुकलीचा कोरोना रिपोर्ट (Corona Report) पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरामध्ये राहणाऱ्या एका चार वर्षीय मुलीला कोरोना झाल्याने आता तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. एका खाजगी रूग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे या मुलीच्या पालकाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
मागील वर्षभरापासून जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे कोरोना हद्दपार झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र, शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज भागातील अचानक एका चिमुकलीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे याची माहिती रुग्णालयाकडून तातडीने महानगरपालिका आरोग्य विभागाला देण्यात आली. वर्षभरानंतर शहरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने मनपा आरोग्य यंत्रणाही हादरली आहे. आगामी सणासुदीचा काळ पाहता आणि होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाकडून त्यादृष्टीने पाऊलं उचलल्या जाण्याची शक्यता आहे.
चिमुकलीच्या पालकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
मनपा आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने चिमुकली उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालय गाठले. तसेच या चिमुकलीच्या पालकांची चाचणी केली आहे. सोबतच तिच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहितीसह इतर माहिती घेण्यात आली. मात्र, चिमुकलीच्या पालकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आता चिमुकलीला कोरानाची लागण झालीच कशी, असा प्रश्न निर्माण होत असून त्यादृष्टीने आरोग्य विभागा आता कामाला लागला आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर कोरोनाची एन्ट्री...
मागील वर्षभरापासून कोरोना हद्दपार झाला होता. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, शनिवारी चार वर्षीय चिमुकलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आहे, अशात शहरात कोरोनाचा रुग्ण आढळून आला असल्याने आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. तर, पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसून, फक्त गर्दीत जातांना काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )