New Virus Found : चिनी वैज्ञानिकांकडून 8 धोकादायक विषाणूंचा शोध, एक तर कोरोनाचा अवतार; जगाला दिला इशारा
New Viruses Found : संशोधकांकडून या विषाणूंवर संशोधन सुरू आहे. जेणेकरून या विषाणूंचा फैलाव झाल्यास महासाथीच्या आजाराला तोंड देणे आणखी सोपं व्हावे.
बीजिंग : चीनमधील शास्त्रज्ञांच्या एका पथकाने आठ नव्या विषाणूंचा (New Viruses) शोध लावला आहे. हे विषाणू मानवी समुदायात संसर्ग फैलावू शकतात, असा इशाराही चिनी शास्त्रज्ञांनी (Chinese Scientists) दिला आहे. हे विषाणू उष्णकटिबंधातील बेट हेनान येथे सापडले आहेत. संशोधकांकडून या विषाणूंवर संशोधन सुरू आहे. जेणेकरून या विषाणूंचा फैलाव झाल्यास महासाथीच्या आजाराला तोंड देणे आणखी सोपं व्हावे. शास्त्रज्ञांनी या बेटांवरील उंदीरं आणि खार यांच्याकडून 700 नमुने जमा केले आहेत. त्यात 8 नव्या विषाणूंचा शोध लागला आहे.
'मिरर'ने दिलेल्या वृ्त्तानुसार, या विषाणूंमुळे मानवांमध्ये संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. हे विषाणू मानवांना कसे संक्रमित करू शकतात हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अधिक संशोधनाची मागणी केली आहे. चिनी शास्त्रज्ञांचा हा शोध चिनी सरकारी संस्थेशी संबंधित असलेल्या व्हायरोलॉजिका सिनिका जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ही संस्था चीनचे नागरी व्यवहार मंत्रालयाशी संबंधित आहे. या जर्नलचे संपादक डॉ. शी झेंगली हे एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी कोरोना विषाणूचे केंद्र असलेल्या वुहान संस्थेतही काम केले आहे.
नवीन कोरोना विषाणूचे नाव काय?
या संशोधनात उंदीरांच्या गुद्द्वार आणि घशातून 682 नमुने घेण्यात आले. हे प्राणी 2017 ते 2021 दरम्यान हेनान बेटावरून पकडले गेले होते. त्यानंतर हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. जेणेकरून त्यांची चाचणी करता येईल. या विश्लेषणातून अनेक नवीन प्रकारचे व्हायरस समोर आले आहेत. यापैकी एक नवीन कोरोना विषाणू आहे आणि त्याला CoV-HMU-1 असे नाव देण्यात आले आहे.
या शास्त्रज्ञांनी सांगितले की, नवीन कोरोना विषाणू ही केवळ चिंतेची बाब नाही. इतर विषाणू देखील ताप, कावीळ आणि डेंग्यूशी संबंधित आहेत. त्यांनी सांगितले की, यामध्ये एस्टोव्हायरस देखील समाविष्ट आहे ज्यामुळे पोटात संसर्ग होऊ शकतो. एक विषाणू आहे जो कर्करोग वाढवू शकतो. संशोधकांनी सांगितले की हे शक्य आहे की जगातील दुर्गम भागात आणखी बरेच अज्ञात विषाणू लपले आहेत. संशोधनातील निष्कर्षामुळे आमच्या व्हायरसबाबततची माहिती वाढत असल्याचे संशोधकांनी सांगितले.
कोरोना व्हायरस चीनच्या वुहान शहरातूनही पसरला आणि या महामारीमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्याशिवाय, कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभरातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. आता या नव्या शोधामुळे जगाची चिंता वाढली आहे.