Chhatrapati Sambhajinagar : पतसंस्था बुडाली, तीस लाख अडकले, आता कॅन्सरच्या उपचाराला चार लाखही मिळेनात, छत्रपती संभाजीनगरमधील घटना उघडकीस
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये पतसंस्थेत पैसे ठेवल्यानंतर ती पतसंस्था बुडाली. दरम्यान त्यामध्ये ठेवी असलेल्या ठेवीदारांना सध्या अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर : एखाद्या पतसंस्थेचा घोटाळा अनेकांचे जीवन उध्वस्त करतो. संकटकाळी कष्टाने जपवलेली पुंजी उपयोगी यावी म्हणून अनेकजण आपला पैसा पतसंस्था आणि बँकेमध्ये ठेवतात. पण तो जीवनातील अत्यंत कठीण क्षणी कामाला येत नाही कारण त्यावर कोणीतरी डल्ला मारलेला असतो. असाच काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून ( Chhatrapati Sambhajinagar) समोर आलंय.
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे संतोष शेलार यांचं वय 40 वर्ष आहे. ते केटरिंग मॅनेजर आणि वाहन चालवण्याचा देखील काम करतात. त्यांची पत्नी पाळणा घरात नोकरी करते. त्यांनी आदर्श पतसंस्थेत प्लॉट विकून आणि जवळचे असे 30 लाख रुपये ठेवले. पण तीच पतसंस्था आज बुडालीये.
कॅन्सरने त्रस्त
शेलार हे सध्या तोंडाच्या कॅन्सरने त्रस्त आहेत. डॉक्टरांनी त्यांना चांगल्या रुग्णालयात जाऊन उपचार करण्याचा सल्ला दिलाय. मात्र त्यांच्या आयुष्यभराची कमाई छत्रपती संभाजीनगर मधील आदर्श घोटाळ्यात अडकली शेलार यांनी मोठ्या कष्टाने जमा झाले केलेला पै पै शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मध्ये गुंतवला. चांगला व्याज मिळेल या अपेक्षेने त्यांनी आयुष्यभराची तुटपुंजी बँकेत एफडी केली. मात्र काही दिवसांपूर्वी या बँकेचा घोटाळा झाल्याचं समोर आलं
अनेक ठेवीदारांना करावा लागतोय संकटाचा सामना
अशी अवस्था एकट्या संतोष शेलार यांची नसून, अनेक ठेवीदार याच संकटाचा सामना करतायत. लाखो रुपये बँकेत पडून आहे, मात्र, आज रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पैसे नसल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ अनेक ठेवीदारांवर आलीये. कोणाला रुग्णालयात उपचारासाठी पैसे नाही,तर कुणी मुलीच्या लग्नासाठी जमा केले ते पैसे बँकेत अडकले आहेत. काहींनी पैसे बुडणार या भितीने आयुष्य संपवलं. आदर्श बँक घोटाळ्यात फसवणूक झालेल्या ठेवीदारांना न्याय देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून खासदार इम्तियाज जलील लढा देत असून त्यांनी लोकसभेत देखील यासंदर्भात आवाज उठवलाय.
यापूर्वी देखील ठेवीदारांचे पैसे अडकले उपचाराला पैसे मिळाले नाहीत म्हणून एकाचा मृत्यू झालाय .मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरसह बीड आणि इतर जिल्ह्यात देखील पतसंस्था घोटाळे समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात व्याज मिळत असल्याच्या अपेक्षाने सर्वसामान्य ठेवीदार आयुष्याची तुटपुंजी बँकेत ठेवतो. पण याच ठेवीदारांच्या पैशावर सहजपणे डल्ला मारला जातोय. पुढे गुन्हा दाखल होतो, तपासही होतो, आरोपींवरील गुन्हे देखील सिद्ध होतात पण तोपर्यंत फसवणूक झालेला ठेवीदार आणि त्याची पिढी बरबाद झालेली असते.