Chhatrapati Sambhaji Nagar : संभाजीनगर शहरातील हवेची गुणवत्ता मोजायला मनपा बसवणार 30 यंत्र
Chhatrapati Sambhaji Nagar : मनपाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी भुवनेश्वरस्थित 'ऑराशूअर' कंपनीसोबत करार केला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी खाजगी एजन्सी आणि गुगल यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त आणि प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली, मनपाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी भुवनेश्वरस्थित 'ऑराशूअर' कंपनीसोबत करार केला आहे. या उपक्रमाद्वारे हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आधारित सॉफ्टवेअरचा वापर केला जाईल आणि प्राप्त डेटाच्या आधारे शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
या प्रकल्पांतर्गत, 30 वायु गुणवत्ता आणि ग्रीन हाउस गॅस (GHG) सेन्सर उपकरण शहरात कार्यान्वित केले जाईल. यापैकी 25 संपूर्ण शहरातील वायू प्रदूषणाच्या हॉटस्पॉट्सवर बसविण्यात येतील. तर 5 स्मार्ट सिटी बसेसवर हे उपकरण निश्चित केल्या जातील. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा खांबावरच हे यंत्र बसवले जातील. आणि प्राप्त माहितीची विश्लेषण स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये होणार असल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यावेळी आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले, हवेची गुणवत्ता चांगली असणे, हे कोणत्याही शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यादृष्टीने महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेला एखादे वाहन घ्यायचे असेल तर ते ई- वाहन असेल, यावर भर आहे. चार्जिंग स्टेशनसाठी कमीत कमी दरात जागा उपलब्ध करून देणे, दुभाजकांत वृक्षारोपण, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रस्त्याची डावी बाजू मोकळी राहावी, सायकल ट्रॅक आदींसाठी प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील वर्षापासून पाणी साचणार नाही?
शहरात विविध ठिकाणी पाणी साचतेय, पुढच्या वर्षापासून असे होता कामा नये, अशा सूचना छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शहर अभियंता विभागातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, शहराचे मुख्य रस्त्यांवर कॅचपिट (ड्रेन) तसेच शहरातील आत मधले भाग, सखल भागात जिथे दरवर्षी पाणी साचते अशा सर्व ठिकाणी स्टॉर्म वॉटर सिस्टम म्हणजे ड्रेनेज सिस्टमचे सूक्ष्म नियोजन संबंधित वार्ड अधिकारी यांनी शहर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली करावे. याशिवाय ज्या रस्त्यांवर पोलार्ड खराब झालेली आहे किंवा तुटलेले आहे त्यांच्या जागी त्वरित नवीन पोलार्ड बसविण्याचे निर्देश यावेळी प्रशासकांनी दिले.
इतर महत्वाच्या बातम्या: