Chhatrapati Sambhaji Nagar: वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर संभाजीनगर महानगरपालिकेकडून कारवाई
Chhatrapati Sambhaji Nagar: महानगरपालिकेने तयार केलेला सिमेंट रस्ता आणि फुटपाथवर काही नागरिकांनी आपल्या बंद पडलेल्या चारचाकी मोठ्या गाड्या उभ्या केल्या होत्या.
Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि सिडको वाहतूक विभागाच्या वतीने आज सकाळी सेंट्रल नाका ते एमजीएम गेटपर्यंत कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये चाळीस हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आला. तर सेंट्रल नाका ते एमजीएम मनियार चौकपर्यंत महानगरपालिकेने तयार केलेला सिमेंट रस्ता व फुटपाथवर काही नागरिकांनी आपल्या बंद पडलेल्या चारचाकी मोठ्या गाड्या रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीला आणि नागरिकांना पायी चालल्यास अडचण निर्माण केली होती. त्यांच्याविरुद्ध देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
संजयनगर बायजीपुरा येथील रहिवासी यांनी आपल्या दोन-दोन गाड्या रोडवर उभ्या केल्या होत्या. या बाबत यापूर्वी वाहनधारकांना दहा-दहा हजार रुपये दंड आकारण्यात आलेला होता. तसेच रस्त्यावर नेहमी मनपा आणि सिडको शहर वाहतूक पोलीस पेट्रोलिंगच्या माध्यमाने सूचना देत होते. परंतु त्यांनी या सूचनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावर आज पुन्हा कारवाई करण्यात आली. तसेच एमजीएम प्रवेशद्वारालगत नागरिकांनी मुख्य रोडवर आपल्या दुचाकी पार्किंग केल्या होत्या. प्रथम त्यांना भोंग्याद्वारे वाहने काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. सूचना देऊनही अर्धा तास कोणीही आपले वाहने काढले नाही. त्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी ही वाहने ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये 24 दुचाकी आणि 3 चारचाकी, तीन गाड्यांचा समावेश आहे.
टाऊन सेंटर सिडको पुण्यनगरी पेपरच्या कार्यालयाजवळ दोन चारचाकी हातगाड्या, मोमोज आणि भेलपुरी विकणाऱ्या विरुद्ध यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. तरीदेखील आज त्यांनी पुन्हा या ठिकाणी गाड्या लावून पुन्हा अतिक्रमण केले. त्यामुळे अडथळा निर्माण केल्याने त्यांच्याही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच उद्या आषाढी एकादशी निमित्त गजानन मंदिर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, या मंदिराच्या लगत महापालिकेच्या फुटपाथवर असलेले अतिक्रमित पत्र्याचे शेड जमीनदोस्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणधारकांना देखील यापूर्वीच अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आज कारवाई करण्यात आली आहे.
फुलझाडे विकणाऱ्यांवरही कारवाई...
गजानन महाराज मंदिर परिसरात फुल झाडे, कुंडे व मातीचे मटके विकणाऱ्या काही लोकांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहूतक कोंडी होत होती. तर रस्त्यावर असलेले अतिक्रमण काढून घेण्याच्या त्यांना तीन दिवसांपूर्वी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तीन दिवसांनी त्यांचे अतिक्र्ण कायम असल्याने आज त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली असून, रस्ता मोकळा करण्यात आला आहे. यावेळी फुलझाडे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या: