(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: बसचा थांबा मागे राहिल्याचे लक्षात येताच अचानक ब्रेक मारला अन् मागून ट्रक धडकला; 20 प्रवासी जखमी
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) आडूळ भागात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा (ST Bus) अपघात (Accident) झाला असल्याची माहिती समोर येत आहे. धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरून जातांना आडुळ फाट्यापासून आडुळ गावाकडे वळण्यासाठी चालकाने बसला अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला असून, ज्यात एकूण 20 प्रवासी जखमी झाले असल्याचे समोर येत आहे. तर यातील 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
संभाजीनगरहुन उदगीरकडे जाणारी बस (क्रमांक एमएच 20 बीएल 3823) धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ शिवारातील बायपासवरून रात्री 11 वाजेच्या सुमारास जात होती. दरम्यान आडुळ शिवारात आल्यानंतर बसला आडुळ येथे थांबा असल्याचे चालकाच्या लक्षात आले नाही. मात्र आडूळ फाटा मागे राहिले असल्याचे बस चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने घाईघाईने बसला अचानक महामार्गावरच ब्रेक मारला. मात्र याचवेळी बसच्या पाठीमागे असलेला भरधाव ट्रकने (क्रमांक एपी 21 टिएक्स 3636) बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ट्रकने दिलेल्या धडकीनंतर बस दुभाजकाला जाऊन धडकली. यात बस चालक, वाहकासह जवळपास 20 प्रवासी जखमी झाले. यातील 10 जण गंभीर जखमी आहेत. तर जखमींना आडुळ येथील नागरीकांनी मदतकार्य करुन 1033,108 रुग्णवाहिकेने उपचारासाठी संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नागरिकांनी धाव घेत केली मदत...
रात्री 11 वाजता धुळे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ शिवारातील बायपासवर बसला ट्रकने धडक दिल्याने अपघात झाल्याची माहिती आडूळ येथील गावकऱ्यांना मिळाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अनेक गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तर बसमधील 20 प्रवासी अपघातात झाले होते, ज्यात 10 जण गंभीर जखमी झाले. त्यामुळे घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरु होता. पण आडूळ येथील गावकऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरु करत जखमींना बसमधून बाहेर काढले. त्यांना धीर देत पाणी पाजले. तसेच पोलिसांना याची महिती दिली. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच रुग्णवाहिकाला बोलवत जखमींना शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच अपघातग्रस्त बस बाजूला करत वाहतूक देखील सुरळीत करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या: