Chandrakant Khaire on BJP: छत्रपती संभाजीनगरमधील घटना हा देवेंद्र फडणवीसांचाच प्लॅन; चंद्रकांत खैरेंचा भाजपवर हल्लाबोल
Chandrakant Khaire on BJP: संभाजीनगरमधला राडा हा पूर्वनियोजित कट होता, आणि यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.
Chandrakant Khaire on Chhatrapati Sambhaji Nagar Clash: संभाजीनगरमधला (Chhatrapati Sambhaji Nagar Clash) राडा हा पूर्वनियोजित कट होता आणि यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला. महाविकास आघाडीची 2 एप्रिल रोजी संभाजीनगरमध्ये सभा आहे, ही सभा होऊ नये म्हणून भाजपनं हा कट रचला असंही खैरे म्हणाले. तर खैरेंचे हे सगळे आरोप भागवत कराड यांनी फेटाळून लावले.
मध्यरात्री संभाजीनगरमध्ये घडलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, "महाराष्ट्रात अराजकता निर्माण करण्याचं काम मिंधे सरकारचं सुरू आहे. आम्ही ज्यावेळी मंत्री होतो. त्याकाळात एकही जातीय दंगल या काळात झालेली नाही. पण सध्याच्या काळात खूप वाढल्या आहेत. गृहमंत्री कुठे असतात माहित नाही. त्यांचं काही लक्ष नाही का इथे? मग गृहमंत्र्यांचं फेल्युअर आहे. गृहमंत्र्यांचं, मिंधे सरकारचं फेल्युअर तेच आहे. ते फक्त माणसं सांभाळतात, जनता नाही सांभाळत.
संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची भव्य सभा होणार आहे. यासंदर्भात बोलताना चंद्रकांत खैरेंनी आरोप केला आहे. ते म्हणाले की, "दोन तारखेला संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न मिंधे सरकारकडून केला जात आहे. भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इम्तियाज जलील, भागवत कराड हे गेम करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे मास्टर माईंड आहेत याचे."
पाहा व्हिडीओ : Chandrakant Khaire on Sambhaji Nagar:"मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस, भागवत कराड-जलील यांचं प्लॅनिंग"
मध्यरात्री संभाजीनगरमध्ये घडलेल्या तणाव प्रकरणात जे सगळे सहभागी होते त्या सगळ्यांना पकडा. आता खूप झालं. सगळ्यांना पकडा, नाहीतर आतापर्यंत संभाजीनगरामध्ये जी शांतता होती, ती संपुष्टात यायला वेळ लागणार नाही, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. "हे सरकारचं अपयश आहे, पोलिसांना काय? वरुन आदेश येतात. तणावात पोलिसांच्याही गाड्या जाळण्यात आल्यात. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात कठोर कारवाई करणं आवश्यक आहे.", असंही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, "राज्यात अशांतता निर्माण करणं, हा या सरकारचा एकमेव हेतू आहे. आज दंगली होत आहेत. मुळात राज्यात गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न आहे. देवेंद्र फडवणीस निराश, वैफल्यग्रस्त परिस्थितीत काम करत आहेत. याची कारणं शोधावी लागतील. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी सातत्याने दिसते. काल संभाजीनगरमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली. त्याला राज सरकार जबाबदार आहे. हे सरकारचं अपयश आहे. राज्यात असं वातावरण निर्माण व्हावं, ही सरकारची इच्छा आहे, त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करते आहेत."