सेल नसलेला रिमोट! उद्धव ठाकरेंवर संजय शिरसाट यांची खोचक टीका; पाहा काय म्हणाले?
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. यावेळी 'सेल नसलेला रिमोट' असा उल्लेख करत खोचक टोला शिरसाट यांनी नाव न घेता ठाकरेंना लगावला आहे.
छत्रपती संभाजीनगर : "त्यांचा जो रिमोट आहे, त्याचा सेल गेल्यानं तेही काहीही बोलत नाहीत. त्यामुळे आमच्या सारख्यांना उत्तर द्यावे लागते" अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. याचवेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील पत्रकार परिषेदत ते बोलत होते.
दरम्यान संजय राऊत यांच्यावर टीका करतांना शिरसाट म्हणाले की, "शिवसेनाप्रमुखांनी उभी केलेली संघटना इतकी लाचार होऊ शकते की, पक्षाचा नेता कुठे गेला याची कल्पना नसतांना इतर पक्षातील नेते कुठे गेले, कधी येणार आहे, कधी भेटणार आहे यावर चर्चा होतांना पाहायला मिळत आहे. लाचारी पत्करायची तर किती, याबद्दल वाईट वाटत आहे. इतरांना बेईमान, धोकेबाज, गद्दार अशी नावं ठेवली जातात. परंतु बंदर म्हणतो मेरी लाल, यापद्धतीने त्यांनी आज देखील आपली लाल करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत यांच्या टिकेचे शब्द बसत नाही, असे शिरसाट म्हणाले. मात्र, याचवेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता,"त्यांचा जो काही रिमोट आहे, त्यामधील सेलच संपले आहे. त्यामुळे तेही काही बोलत नाही," असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.
जयंत पाटलांनी छातीवर हाथ ठेवून बोलावे...
जयंत पाटील यांची भाजपसोबत बोलणी सुरु होती, आणि त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला होता असे शिरसाट रविवारी म्हणाले होते. दरम्यान यावर उत्तर देतांना जयंत पाटील म्हणाले होते की, शिरसाट यांच्या बोलण्याचा उद्देश मला माहित नाही, माझं आणि संजय शिरसाट यांचं कधीही या विषयावर बोलणं झालेलं नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शिरसाट यांनी जयंत पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. " जयंत पाटील यांना माहित आहे, मी खोटं बोलत नाही. मी संजय राऊत नाही. मी वेडेवाकडे स्टेटमेंट करत नाही. जयंत पाटील रेटून खरे बोलताय, त्यांनी छातीवर हाथ ठेवून बोलावे. लोक सगळं विसरत नाही, लोकांच्या लक्षात राहते. त्यामुळं 'खोटं बोल, पण रेटून बोल' असे करु नका. मी खरं बोललो असून, याचे पुरावे देऊ शकतो," असे शिरसाट म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा...
शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाल्याच्या चर्चेवर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "त्यांच्यात किती प्रेम आहे राज्याला माहिती आहे. आता जर ते भेट असतील किंवा चर्चा करत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. होत असेल त्यांनी युती तर करावी. मात्र, आम्हाला जो अनुभव आला तो प्रकाश आंबेडकर यांच्यावर येऊ नये इतकंच आमचं म्हणणं आहे," असेही शिरसाट म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: