Comedian Munawar Faruqui : बजरंग दलाकडून कॉमेडियन फारुखीचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न; औरंगाबाद पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात
Comedian Munawar Faruqui : शनिवारी औरंगाबादच्या निराला बाजार परिसरात असलेल्या तापडिया नाट्यमंदिरात हा प्रकार घडला.
Aurangabad News : स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (Standup Comedian Munawar Faruqui) याचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न औरंगाबादमध्ये (Aurangabad) करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांकडून मुनव्वर फारुखीचा शो बंद करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत केलेल्या मध्यस्थीने शो पुन्हा सुरू करण्यात आला होता. शनिवारी औरंगाबादच्या निराला बाजार परिसरात असलेल्या तापडिया नाट्यमंदिरात हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, शो बंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या 5 ते 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
औरंगाबादच्या तापडिया नाट्यमंदिरात शनिवारी सायंकाळी 4 वाजता स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखीचा शो आयोजित केला गेला होता. विशेष म्हणजे, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी देशभरात फारुखीवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्याच्या शोला सतत विरोध होत असतो. याच विरोधामुळे अनेक शो रद्द करण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. दरम्यान, औरंगाबादमध्ये शनिवारी त्याचा शो ठेवण्यात आल्याने यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याच्या याच शोसाठी ऑनलाईन तिकीट विक्री झाली होती.
दरम्यान, ठरल्याप्रमाणे शनिवारी सायंकाळी फारुखीचा तापडिया नाट्यमंदिरात शो सुरू झाला. तर याबाबत माहिती मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते तापडिया नाट्यमंदिरात दाखल झाले. तसेच त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. याबाबत माहिती मिळताच क्रांती चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्यांना तेथून काढण्याचा प्रयत्न केला. तसेच घोषणाबाजी करण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केला. परंतु बजरंग दलाचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. तर, याबाबत माहिती मिळताच पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कार्यकर्त्यांची समजूत घालत पुन्हा शो सुरू करण्यास परवानगी दिली. तसेच, यावेळी 5 ते 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
अनकेदा शो रद्द करण्याची वेळ...
स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचे देशभरात शो होत असतात. मात्र, त्याच्या शो अनेक ठिकाणी विरोध देखील होत असतो. तसेच, हाच विरोध पाहता अनेकदा पोलिसांकडून त्याच्या शो ला परवानगी देखील नाकारली जाते. काही दिवसांपूर्वी बंगळुरू येथे होणारा त्याचा शो रद्द करण्यात आला होता. मुनव्वरच्या 'डोंगरी टू नोव्हेअर' या शोला पोलिसांनी मान्यता न दिल्याने हा शो रद्द करण्यात आला होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Lock Upp Show : अॅसिड प्यायल्यानं आईचा मृत्यू; लॉक-अप शोमध्ये मुनव्वर फारूकीचा गौप्यस्फोट