Aurangabad Crime News : काठीने हातावर मारून रेल्वे प्रवाशांचे मोबाईल लंपास करायचे, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Aurangabad Crime News : अल्पवयीन आरोपी मुलांकडून पोलिसांनी 4 लाख 30 हजार 300 रुपयांचे तब्बल 38 मोबाईल जप्त केले आहेत.
Aurangabad Crime News : रेल्वेच्या दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल लाकडी काठीने हातावर मारून लंपास करणाऱ्या तिघा अल्पवयीन टोळीला औरंगाबादच्या (Aurangabad) मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई 11 जूलै रोजी मुकुंदवाडी रेल्वेस्थानक गेट क्रं. 56 जवळ करण्यात आली आहे. या मुलांकडून पोलिसांनी 4 लाख 30 हजार 300 रुपयांचे तब्बल 38 मोबाईल जप्त केले आहेत. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंकज मोरे यांना रेल्वे प्रवाशांचे मोबाईल विक्री करणारी टोळी मुकुंदवाडी रेल्वेस्थानक परिसरातील गेट क्र. 56 जवळ आल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून वरिष्ठांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक मोरे यांनी तत्काळ धाव घेतली असता, त्यांना तीन संशयित दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, एक एक करत तिघा अल्पवयीन बालकांच्या ताब्यातून 38 मोबाईल हस्तगत करण्यात आले. ही कारवाई उस्मानपुरा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रणजित पाटील, मुकुंदवाडी निरीक्षक विठ्ठल ससे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंकज मोरे, नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, अनिल थोरे, गणेश वाघ, योगेश बावस्कर, अनिल कोमटवार, सुभाष राठोड, शैलेश अडीयाल, दिनेश राठोड, प्रभाकर पाटील यांच्या पथकाने केली आहे.
यूट्यूबवर बघून मोबाईलचा पासवर्ड तोडायचे...
पोलिसांनी ताब्यात घेतलेली तिघेही मुले ही 16 ते 17 या वयोगटातील असून ते अल्पशिक्षित आहेत. मोबाईल हा ज्या ठिकाणी गवत आहे त्याच ठिकाणी पाडायचे त्यामुळे रेल्वेतून पडलेला मोबाईल तुटत नव्हता. मोबाईल मिळाल्यानंतर तो लॉक असायचा. हे लॉक उघडण्यासाठी ते यूट्यूबवर पाहून लॉक उघडायचे. त्यानंतर तो फॉरमेट करून विक्री करायचे. त्यांनी 55 हजाराचा मोबाईल एका मजुराला केवळ 3 हजार 500 रुपयांमध्ये विक्री केला होता.
अशाप्रकारे करायचे लुटमार...
तिन्ही अल्पवयीन सोबतच रेल्वे पटरीवर जायचे. चिकलठाणा ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनदरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहायचे. रेल्वे आल्यानंतर कोणत्या डब्यात दरवाजाजवळ, खिडकीजवळ प्रवासी उभे राहून मोबाईलवर बोलत आहेत, ही माहिती समोरच्याला पास केली जायची. त्यानंतर समोरचा आरोपी काठी घेऊन तयार राहायचा. नेमका त्याच डब्यातील प्रवाशाच्या मोबाईल किंवा हातावर काठीने मारून तो मोबाईल खाली पाडला जायचा. अशा पद्धतीने या अल्पवयीन मुलांनी मागील पाच ते सहा महिन्यांमध्ये बराच धुमाकूळ घातला आहे. नांदेड, बीड येथे यातील अनेक मोबाईल विक्री केले आहेत, अशी माहिती तपासात समोर आली.
इतर महत्वाच्या बातम्या: