Aurangabad Crime : विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने सुटली गोळी; घेतला स्वतःच्याच लेकराचा बळी
Aurangabad :: गावठी कट्ट्यातून सुटलेली गोळी अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली.
![Aurangabad Crime : विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने सुटली गोळी; घेतला स्वतःच्याच लेकराचा बळी aurangabad crime news firing in own house child was shot Aurangabad Crime : विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने सुटली गोळी; घेतला स्वतःच्याच लेकराचा बळी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/28/a4f1200b71c933b71831ac88e108e10e1693200376750737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
औरंगाबाद : गंगापूर शहरात मन सुन्न करुन टाकणारी घटना समोर आली आहे. खासगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने अवैधरित्या गावठी कट्टा विकत घेतला. पण विकत घेतलेला कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 48 तासात त्याची मृत्यूशी झुंज संपली. रविवारी (27 ऑगस्ट) सकाळी 7 वाजता या चिमुकल्याचा मृत्यू झाला. आर्यन राहुल राठोड (वय 2 वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव असून, राहुल कल्याण राठोड (वय 29 वर्ष) असे त्याच्या वडिलांचे नाव आहे.
औरंगाबादच्या गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे राहुल कल्याण राठोड आपली पत्नी संगीता आणि अडीच वर्षांच्या मुलासह राहतो. राहुल हा कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. दरम्यान, आपल्या कामात वसुलीचे करण्याची गरज पडते म्हणून त्याने एक गावठी कट्टा विकत घेतला. 25 ऑगस्ट रोजी तो गावठी कट्टा आपल्या घरी घेऊन आला. पण हा गावठी कट्टा नेमका चालवायचा कसा याबाबत राहुलला कोणतीही माहिती नव्हती. दरम्यान, घरी आल्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास आपण आणलेला गावठी कट्टा तो आपल्या पत्नीला दाखवत होता. पण याचवेळी कट्ट्यातून गोळी सुटली आणि त्यांच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. घरात झालेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला होता.
आर्यनच्या कपाळात मधोमध गोळी लागली होती. तेव्हापासून तो अत्यवस्थ होता. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी (25 ऑगस्ट) रात्री त्याची शस्त्रक्रिया केली होती. तेव्हापासून तो घाटीतील अतिदक्षता विभागात होता. त्याचा धोका टळलेला नव्हता. त्याची मृत्यूशी झुंज सुरुच होती. दरम्यान, 48 तासांनंतर अखेर त्याला मृत्यूने गाठले.
अन् आर्यनच्या आईने टाहो फोडला
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली होती. तसेच राहुलला ताब्यात घेऊन अटक केली होती. तर गोळीबारात जखमी झालेल्या आर्यनजवळ त्याची आई संगीता आणि इतर नातेवाईक होते. दरम्यान, रविवारी सकाळी आर्यनच्या मृत्यूची बातमी डॉक्टरांनी देतात संगीता यांनी घाटी रुग्णालयात टाहो फोडला. हे पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले. याशिवाय मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच परिसर हळहळून गेला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)