(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Temple Dress Code : छत्रपती संभाजीनगरमधील मंदिरांमध्येही आता 'ड्रेसकोड'; वेगवेगळ्या 20 मंदिरात लागले फलक
Temple Dress Code : शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक पाहायला मिळत आहे.
Temple Dress Code : गेल्या काही दिवसांपासून मंदिरात प्रवेश करताना ड्रेसकोड (Dress Code) परिधान करावा, अशी नियमावली देशभरातील वेगवेगळ्या मंदिरात लागू करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, राज्यातील अनेक ठिकाणी अशीच काही नियमावली लागू करण्यात आली आहे. तर याला काही ठिकाणी पाठींबा मिळत असून, काही ठिकाणी विरोध देखील होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील काही मंदिरात देखील अशी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे. कारण याबाबत शहरांतील वेगवेगळ्या 20 मंदिरात ड्रेसकोडबाबत फलक लावण्यात आले आहे. शहरातील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने हे फलक लावण्यात आले आहेत.
मंदिरात प्रवेश करताना भारतीय परंपरेला शोभणारीच वस्त्रे परिधान करावीत, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जात आहे. त्यानंतर राज्यसह देशातील अनेक मंदिरात ड्रेसकोडबाबत निर्णय घेण्यात आले. अश्लील, बीभत्स, उत्तेजक वस्त्र परिधान करू नयेत, असे निर्णय घेत त्याबाबत मंदिरात फलक लावण्यात आले आहेत. तर आता छत्रपती संभाजीनगर शहरातील काही मंदिरात देखील असेच फलक लावण्यात आले आहे. शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक पाहायला मिळत आहे.
मंदिरात लावण्यात आलेल्या फलकावर मंदिरातील संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून तरुणांनी हाफ पँट घालून मंदिरात येऊ नये, अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. तसेच फॅशनच्या नावाखाली तरुणींनी गुडघ्यापर्यंत स्कर्ट तसेच लोअर घालून मंदिरात येऊ नयेत. विविध प्रकारचे कपडे परिधान करणे हा वैयक्तिक मुद्दा असला तरीही मंदिर ही श्रद्धेची जागा असल्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
#TempleDressCode : छत्रपती संभाजीनगरमधील मंदिरांमध्ये सुद्धा आता 'ड्रेसकोड'; वेगवेगळ्या 20 मंदिरात लागले फलक pic.twitter.com/a15wdQBrBs
— ABP माझा (@abpmajhatv) July 5, 2023
तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रेस कोडच्या निर्णयावरुन यू टर्न घेतला
यापूर्वी देखील राज्यातील काही मंदिरात असेच निर्णय घेण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील 16 मंदिरांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येताना नियमावलीचे पालन करावे लागत आहे. तर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गाभाऱ्यात जाण्यासाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. मात्र या निर्णयाला विरोध झाल्याने तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रेस कोडच्या निर्णयावरुन यू टर्न घेतला होता. तसेच कपड्यांवरुन भाविकांना कोणतेच निर्बंध घातले नसल्याचं सांगण्यात आले होते. त्यामुळे आता संभाजीनगर शहरातील मंदिरांनी घेतलेल्या निर्णयाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :