Chhatrapati Sambhaji Nagar: नामांतराच्या मुद्यावरून मनसे पुन्हा रस्त्यावर उतरणार, 'स्वप्नपूर्ती रॅली' काढणार
Chhatrapati Sambhaji Nagar : नामांतराच्या समर्थनात मनसेकडून 16 मार्च रोजी स्वप्नपूर्ती रॅली काढण्यात येणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) करण्याचा निर्णय झाला असून, यावर 27 मार्चपर्यंत हरकती आणि आक्षेप मागवण्यात आले आहेत. मात्र याच निर्णयावरून राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. काही राजकीय पक्ष विरोधात तर काही पक्ष समर्थन करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान आता नामांतराच्या मुद्यावरून मनसे (MNS) पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. नामांतराच्या समर्थनात मनसेकडून 16 मार्च रोजी स्वप्नपूर्ती रॅली काढण्यात येणार आहे. तर ही रॅली थेट विभागीय आयुक्त कार्यलयात जाऊन धडकणार आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्यावरून राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळत आहे. एकीकडे नामांतराला विरोध होत असताना आता नामांतराच्या समर्थनात मनसेकडून 16 मार्च रोजी स्वप्नपूर्ती रॅली काढण्यात येणार आहे. नामांतराच्या समर्थनात भरलेले पत्र घेऊन या रॅलीच्या माध्यमातून विभागीय आयुक्त कार्यालयावर मनसे धडकणार आहे. तसेच शहरातील वेगवेगळ्या भागातील नागरिकांकडून नामांतराच्या समर्थनात अर्ज भरून घेऊन, हे अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात जमा केले जाणार आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयावर 'स्वप्नपूर्ती रॅली' काढणार
दरम्यान याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले की, केंद्र सरकारने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आहे. या निर्णयानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. अनेक दशकापासूनचे शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचे स्वप्न या निर्णयामुळे पूर्ण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 'स्वप्नपूर्ती रॅली' आयोजित केली असून, 16 मार्च रोजी नामांतराच्या समर्थनात पत्र घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय येथे ही रॅली जाणार आहे. यावेळी हजारो समर्थन पत्रके सरकार दरबारी पोहचवणार आहोत.
नामांतराविरोधात उपोषण सुरुच...
औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने, या नामांतराच्या निर्णयाला औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समतीकडून विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 मार्चपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाचा आज 10 दिवस असून, अजूनही उपोषण सुरूच आहे. तर उपोषणाला मोठा पाठींबा मिळताना देखील पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
नामांतराविरोधात 11 हजार 767 आक्षेप अन् समर्थनात 35 अर्ज; आक्षेप नोंदवण्यासाठी शेवटचे नऊ दिवस