व्हिडीओ: महिला सरपंच पतीच पाहतो ग्रामपंचायतचं काम, अखेर वैतागलेल्या गावकऱ्यांनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'
Chhatrapati Sambhaji Nagar : विशेष म्हणजे पत्नीचा कारभार पाहणाऱ्या सरपंच पतीचं गावकऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करुन भांडाफोड केला आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News: ग्रामीण भागात अजूनही महिलांना त्यांचे अधिकार मिळत नसल्याचे अनेकदा समोर आले आहेत. तर ग्रामपंचायतमध्ये देखील महिला निवडून येतात, पण त्यांचे काम सरपंच पती (Sarpanch Husband) किंवा नातेवाईकच बघत असल्याचे पाहायला मिळते. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी महिला सरपंच पती फक्त ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेपच करत नाही, तर चक्क पत्नीची सही देखील करतो. तसेच ग्रामपंचायतच्या चेकवर सही करुन पास देखील करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या सरपंच पतीचा गावकऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन (Sting Operation) करुन भांडाफोड केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर तालुक्यातील पाच हजार लोकसंख्या असलेल्या गाजगाव ग्रामपंचायतची 2021 मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत आशाबाई तुळशीराम धुमाळ यांची गावाच्या सरपंचपदी निवड झाली. मात्र आशाबाई या सरपंचपदी निवड झाल्यापासून त्यांचा सर्व कारभार त्यांचे पती तुळशीराम धुमाळ हेच पाहत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. एवढंच नाही तर तुळशीराम धुमाळ यांच्या सततच्या हस्तक्षेपाला कंटाळून गावकऱ्यांनी त्यांचे थेट 'स्टिंग ऑपरेशन' केले. तसेच याबाबत कारवाईची देखील मागणी केली जात आहे.
थेट सही करुन चेकही पास करतात...
ग्रामपंचायतच्या विकासकामांसाठी शासनाकडून निधी दिला जातो. तर ग्रामपंचायत स्तरावर संबंधित लोकांना कामे देऊन करुन घेतली जाते. परंतु झालेल्या कामाचे बिल अदा करण्यासाठी किंवा ग्रामपंचायतचे कोणतेही पेमंट देण्यासाठी चेकवर ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या सह्या लागतात. मात्र गाजगाव येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच असलेल्या आशाबाई तुळशीराम धुमाळ यांच्या जागी त्यांचे पती तुळशीराम धुमाळ हेच सह्या करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महिलांना ग्रामपंचायत आरक्षण मिळून देखील अधिकार मात्र अजूनही मिळाले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
गावकऱ्यांनी केला 'स्टिंग ऑपरेशन'...
आशाबाई तुळशीराम धुमाळ या सरपंच असताना देखील त्यांचा कारभार त्यांचे पती तुळशीराम धुमाळ करतात. विशेष म्हणजे ज्यांच्यावर पत्नीच्या नावे सह्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे, तर तुळशीराम धुमाळ हे निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. तर ग्रामपंचायतमध्ये त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या हस्तक्षेपाचा गावकऱ्यांनी 'स्टिंग ऑपरेशन'कडून व्हिडीओ तयार केला आहे. ज्यात तुळशीराम धुमाळ ग्रामपंचायतमध्ये बसून कागदपत्रावर शिक्के मारुन सही करताना पाहायला मिळत आहे. तर याबाबत 'एबीपी माझा'च्या प्रतिनिधी यांनी गावात जाऊन याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे सरपंच पती ग्रामसेवक यांच्यासमोर सरपंच पत्नीच्या नावाने सही करत असताना त्यांच्याकडून कोणताही विरोध करण्यात येत नाही. त्यामुळे यात ते देखील दोषी असून, त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
