Chhatrapati Sambhaji Nagar: मतदानापूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला गालबोट; प्रचाराला गेलेल्या उमेदवाराला मारहाण
Chhatrapati Sambhaji Nagar: प्रचारासाठी गावात गेलेल्या या उमेदवाराला आमच्या नेत्याबद्दल का बोललात म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर: राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Market) निवडणुका जाहीर झाल्या असून, 28 एप्रिलला मतदान होणार आहे. दरम्यान मतदानापूर्वीच या निवडणुकांना गालबोट लागला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एका उमेदवाराला मारहाण करण्यात आली आहे. प्रचारासाठी गावात गेलेल्या या उमेदवाराला आमच्या नेत्याबद्दल का बोललात म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्यांना मारहाण करण्यात आली ते काँग्रेसचे पदाधिकारी असून, त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण सात बाजार समित्यांसाठी 28 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून गावागावात जाऊन प्रचार सुरू आहे. दरम्यान पैठण तालुक्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे. मात्र पैठण येथे एका गावात प्रचारासाठी गेलेल्या उमेदवाराला मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. बाबासाहेब पवार, निवृत्ती पोकळे यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप होत आहे. इंदेगाव येथे प्रचारासाठी गेले असताना ही मारहाण करण्यात आली आहे. तर मारहाण करतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत जखमी यांनी पैठण पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्यामुळे मतदानापूर्वीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वातावरण तापले आहेत.
भाजपची निवडणुकीतून माघार!
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या विरोधात महाविकास आघाडी असा सामना होण्याची शक्यता होती. भाजपकडून 13 उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते. मात्र शिंदे गटाकडून भाजपला अपेक्षित आशा जागा देण्यात आल्या नाही. अनेकदा बैठका होऊन देखील शिंदे गटाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने, भाजपने पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरोधात शिंदे गट असा सामना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत.
जिल्ह्यात अशी आहे परिस्थिती!
छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीसह फुलंब्री, पैठण, लासूर स्टेशन, वैजापूर, गंगापूर आणि कन्नड अशा एकूण 7 बाजार समित्यांसाठी येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी निवडणुकीतून माघार घेतली. तर या सातही बाजार समितीत आता 378 उमेदवार रिंगणात उरले आहे. ज्यात सर्वाधिक 86 उमेदवार कन्नड बाजार समितीत आपले नशीब आजमावत आहेत. तर सर्वांत कमी 38 उमेदवार पैठणमध्ये रिंगणात आहेत. सोबतच फुलंब्री 42, लासूरस्टेशन 58, वैजापूर 56, छत्रपती संभाजीनगर 47, आणि गंगापूर बाजार समितीमध्ये 51 उमेदवार रिंगणात आहेत.