अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलीलांना झटका, संभाजीनगरमधील अमखास मैदानात यापुढे MIM च्या सभेला परवानगी मिळणार नाही
Abdul Sattar On MIM : तसेच एमआयएमने आता हैदराबादला सभा घ्याव्यात असा खोचक टोलाही सत्तार यांनी लगावला आहे.
छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वीच अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी एमआयएम (MIM) पक्षाला मोठा झटका दिला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील अमखास मैदानात (Amkhas Maidan) प्रत्येक निवडणुकीत भव्य सभा घेणाऱ्या एमआयएमला यापुढे या मैदानात सभा घेण्यासाठी परवानगी मिळणार नसल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे. तसेच एमआयएमने आता हैदराबादला सभा घ्याव्यात असा खोचक टोलाही सत्तार यांनी लगावला आहे. विशेष म्हणजे खुद्द एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या समोरच पत्रकार परिषेदत सत्तार यांनी ही माहिती दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत बोलतांना अब्दुल सत्तार म्हणाले की, "संभाजीनगर शहरातील अमखास मैदानावर आम्ही भव्य असा स्टेडीयम उभारण्याचा निर्णय घेतलाय. ही जागा आमच्या खात्याची म्हणजेच वक्फ बोर्डाची आहे. त्यामुळे या 19 एकरवर मोठं स्टेडीयम उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हिवाळी अधिवेशनात यासाठी निधी देण्यात येईल. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि माझं खातेही म्हणजे अल्पसंख्याक विभाग देखील यासाठी पैसे देईल. त्यामुळे आता येथे फुटबॉल प्रेमी देशभरातून येतील. यासाठी 150 कोटींवर खर्च होईल असा अंदाज आहे. तसेच याठिकाणी जागतिक पातळीवरच्या सुविधा फूट बॉलसाठी देण्यात येईल, असेही अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. त्यामुळे यापुढे या मैदानात कोणाच्याही सभेला परवानगी दिली जाणार नाही. यापूर्वी एमआयएम येथे सभा घेत होते, पण आता त्यांनी हैदराबादला सभा घ्यावी," असा खोचक टोला सत्तार यांनी लगावला आहे.
एमआयएमची अडचण वाढणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची एन्ट्री झाल्यापासून त्यांच्या सर्व महत्वाच्या सभा आतापर्यंत शहरातील आमखास मैदानावरच झाल्या आहेत. महानगरपालिका निवडणुका, लोकसभा, विधानसभेच्या प्रचारासाठी घेण्यात येणाऱ्या सभा देखील एमआयएमकडून याच मैदानात घेण्यात येतात. या मैदानाच्या आजूबाजूला शहरातील मुस्लीम बहुल भाग असल्याने एमआयएमच्या सभेला देखील मोठी गर्दी होते. विशेष म्हणजे एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबर ओवैसी यांच्या सुद्धा सभा याच आमखास मैदानावर होतात. त्यामुळे आता सत्तार यांच्या घोषणेनंतर एमआयएमची अडचण वाढली असून, त्यांना आता सभेसाठी नवीन मैदान शोधावे लागणार आहे.
आरक्षणावर प्रतिक्रिया...
राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून, यावर देखील अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही वाद न करता मराठा समाजाला त्यांचे आरक्षण मिळाले पाहिजे. यापूर्वी जेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता, त्यावेळी देखील कॅबिनेटच्या बैठकीत मी होतो. आता प्रश्न एकच आहे की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही आमची अपेक्षा आहे. यापूर्वी देखील आमची हीच इच्छा होती आणि आतादेखील आहे. मात्र, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद व्हायला नको पाहिजे. त्यामुळे दोघांना देखील माझी हात जोडून विनंती आहे की, दोघांनी देखील असा वाद करू नयेत, असे सत्तार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
समाजवादीसोबत युती, आयसीस, रझा अकादमी, MIM ला का सोडताय? नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल