(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धानोरकर-वडेट्टीवार वादाचा पुन्हा एक अध्याय, विजय वडेट्टीवारांना पाडण्याचं प्रतिभा धानोरकरांचं अप्रत्यक्ष आवाहन
Pratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांच्या ब्रम्हपुरीमध्ये कुणबी मतदारांची मोठी संख्या असून त्या ठिकाणी कुणबी आमदार निवडून द्यावा असं आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलं आहे.
चंद्रपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्षाचा पुन्हा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. प्रतिभा धानोरकर यांनी रविवारी थेट विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात जाऊन अल्पसंख्यकांची सत्ता संपवा आणि पक्ष न पाहता कुणबी उमेदवार निवडून आणा असं आवाहन केलंय. त्या माध्यमातून धानोरकरांनी अप्रत्यक्षपणे विजय वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं आवाहन केलंय.
ब्रम्हपुरीतून अल्पसंख्यकांची सत्ता संपवा, पक्ष न पाहता फक्त कुणबी उमेदवार निवडून आणा असं आवाहन केलंय चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी. धानोरकर यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा इशारा होता त्यांचे पक्षांतर्गत विरोधक आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे. वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी मतदारसंघात जवळपास 60 हजार कुणबी मतदार आहेत आणि हीच बाब लक्षात घेऊन धानोरकर यांनी वडेट्टीवारांना पराभूत करण्याचा ब्रम्हपुरी शहरात झालेल्या कुणबी महाअधिवेशनात अप्रत्यक्ष इशारा दिला.
वडेट्टीवारांच्या विरोधात भाजप कुणबी उमेदवार देणार
वडेट्टीवार यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत भाजप कुणबी समाजाचा उमेदवार देणार असल्याची जोरदार चर्चा आहे. आमदार परिणय फुके यांनी तर जाहीरपणे आपण देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे कुणबी उमेदवार देण्याची मागणी करणार असल्याचं वक्तव्य देखील केलं. विशेष म्हणजे फुके यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून धानोरकर यांनी यावेळी पक्ष न पाहता कुणबी उमेदवाराला जिंकून देण्याचं जाहीर आवाहन केलं.
लोकसभेपासून वाद
लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर आपणच लोकसभेचे दावेदार असल्याचा प्रतिभा धानोरकर यांनी उघड दावा केला होता. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी आणि युवक काँगेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवारीची मागणी केली होती.
याच दरम्यान प्रतिभा धानोरकर यांनी पक्षातीलच काही नेत्यांनी त्रास दिल्यामुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक आरोप केल्याने मोठा वाददेखील झाला होता. मात्र त्यानंतर धानोरकर यांना उमेदवारी मिळाली आणि हा वाद शांत झाला.
धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्यावर वडेट्टीवार यांनी त्यांना गडचिरोली लोकसभेची जबाबदारी असल्याचं सांगत चंद्रपूर लोकसभेतून काढता पाय घेतला. लोकसभेच्या विजयानंतर धानोरकर यांनी देखील वडेट्टीवार यांच्यासोबत एकाच मंचावर येण्याचं आतापर्यंत टाळलं आहे.
गडचिरोलीचा नाही तर चंद्रपूरचा आमदार मंत्री होणार
वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील वाद लोकसभेनंतर शांत झाला असला तरी थांबलेला नाही हे अनेक वेळा स्पष्ट झालंय. चंद्रपूर जिल्हयातील विधानसभेच्या सर्व जागा मीच वाटणार आहे. यावेळी गडचिरोली लोकसभेतील नाही तर चंद्रपूर लोकसभेतील आमदार मंत्री होणार असं जाहीर वक्तव्य या आधी प्रतिभा धानोरकर यांनी केलं आहे.
काँग्रेस अंतर्गत वादामुळे विधानसभेला फटका बसण्याची शक्यता
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चंद्रपूर आणि गडचिरोली मतदारसंघात मोठं यश मिळालं होतं. मात्र वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील संघर्ष असाच सुरु राहिला तर विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो.
ब्रम्हपुरी येथील वक्तव्यामुळे झालेल्या वादावर प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार हे दोघेही कॅमेरावर बोलायला तयार नाहीत. मात्र धानोरकर यांच्या वक्तव्यामुळे विजय वडेट्टीवार हे अतिशय दुखावले गेले असून ते याबाबत पक्षश्रेष्ठींकडे याची तक्रार करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
ही बातमी वाचा :