Buldhana News: रविकांत तुपकरांच्या भूमिकेकडे सर्वाचं लक्ष, कार्यकर्त्यांची बोलावली तातडीची बैठक
Buldhana News: स्वाभिमान नेते रविकांत तुपकर यांनी बोलावली कार्यकर्त्यांची तातडीची बैठक. तुपकर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष.
Maharashtra Buldhana News: स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Swabhimani Shetkari Sanghatana Ravikant Tupkar) यांनी आज कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलवली आहे. आजच्या बैठकीत रविकांत तुपकर मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) आणि राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यात अनेक दिवसापासून बेबनाव सुरू आहे. त्यामुळे या बैठकीत तुपकर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान, यापूर्वीच रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आजची बैठक नेमकी कशासाठी? या बैठकीचा नेमका उद्देश काय? अशा अनेक चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटना वाढवण्यासाठी रविकांत तुपकर यांचा मोठा वाटा आहे. मात्र अलिकडेच खासदार राजू शेट्टी यांनी बुलढाण्यातून लोकसभेसाठी रविकांत तुपकरच हे आमचे उमेदवार असतील अशी घोषणाही केली. मात्र वास्तव काही वेगळं असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. रविकांत तुपकर यांना राजू शेट्टी हे सातत्यानं डावलत आहेत, असा अनुभव कार्यकर्ते सांगत आहेत आणि त्यामुळे रविकांत तुपकर हे काही वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांनी आज बुलढाणा येथे तातडीनं कार्यकर्त्यांची एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत रविकांत तुपकर कार्यकर्त्यांशी संवाद साधून नेमका काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजू शेट्टी हे बुलढाणा जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दोनदा येऊन गेले आहेत, मात्र रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांची जिल्ह्यात एकदाही भेट झाली नाही किंवा हे दोन्ही नेते दोन वर्षांपासून एका व्यासपीठावर आले नाही. दोनदा जिल्ह्यात येऊनही राजू शेट्टी हे तुपकरांच्या निवासस्थानी गेले नाहीत. एका बाजूला राजू शेट्टी हे रविकांत तुपकर यांची बुलढाणा लोकसभेची उमेदवारी जाहीर करतात, पण दुसऱ्या बाजूला विचारात न घेता बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करतात. त्यामुळे राजू शेट्टी आणि तुपकर यांचा बेबनाव हा आता उघड झालेला आहे आणि अशा परिस्थितीत तुपकर कुठला निर्णय घेतात? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.