(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rain : बुलढाणा जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात शेतीचं मोठं नुकसान, वाचा सविस्तर आकडेवारी
Buldhana : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. शेती पिकांना (Agriculture Crop) मोठं नुकसान झालं आहे.
Buldhana Rain News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं तेथील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अनेक गुरांच्या मृत्यू देखील झाला आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्याला या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. झालेल्या सर्व नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहे.
संग्रामपूर तालुक्यात किती नुकसान?
सर्वच पाच मंडळात अतिवृष्टी
पडझड झालेली घरे 2150
शेती आणि पिकांचं झालेलं नुकसान 36855 हेक्टर
वाहून गेलेल्या जनावरांची संख्या 91
मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 1
जळगाव जामोद तालुका किती नुकसान?
सर्वच पाच मंडळात अतिवृष्टी.
पडझड झालेल्या घरांची संख्या 5060.
शेतीच आणि पिकांचं नुकसान 24625 हेक्टर
वाहून गेलेल्या जनावरांची संख्या 112
अतिवृष्टीग्रस्त भागात 37 पुलांचं नुकसान, अद्याप अनेक मार्ग बंद
अतिवृष्टीग्रस्त संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे. या दोन्ही तालुक्यातील 37 पुलांचं नुकसान झालं आहे. अद्याप अनेक मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळं या दोन्ही तालुक्यातील 37 पुलांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पुल खचले आहेत तर काही ठिकाणी पुल उखडून पडले आहेत. त्यामुळे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. जळगाव जामोद-बुऱ्हाणपूर - इंदोर या मार्गावरील भींगारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळं हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यात जनजीवन विस्कळीत आहे.
महाराष्ट्रात सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद
आत्तापर्यंत महाराष्ट्रात (Maharashtra) सरासरीच्या 106 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 24 जुलैपर्यंत राज्यात सरासरी 458.4 मिमी पावसाची नोंद होत असते, मात्र प्रत्यक्षात 485.10. मिमी पाऊस कोसळला आहे. यामध्ये कोकणात (Konkan) सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. याबाबतची माहिती हवामान विभागानं (imd) दिली आहे. आत्तापर्यंत कोकणात 123 टक्के, विदर्भात 108 टक्के, मराठवाड्यात 96 टक्के तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 90 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात पावसानं सरासरी गाठली आहे. तर आठ जिल्ह्यात सरासरीच्या अधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मात्र, सात जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. यामध्ये सांगली, हिंगोली, सोलापूर, सातारा, जालना, अहमदनगर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या: