Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यातील 13 पैकी पाच तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम, येळगाव धरणात फक्त 15 टक्केच पाणीसाठा
बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी पाच तालुक्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्हा मुख्यालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात फक्त 15 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.
Buldhana Rain : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र, असे असले तरी जिल्ह्यात अद्यापही अनेक तालुक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यापैकी पाच तालुक्यात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्हा मुख्यालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या येळगाव धरणात फक्त 15 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील फक्त एक महिना बुलढाणा शहराला पाणी पुरवठा होऊ शकेल इतकाच पाणीसाठा या धरणात शिल्लक आहे.
येळगाव धरण परिसरात अद्याप जोरदार पाऊस जाला आहे. चांगला पाऊस न झाल्यामुळं आगामी काळात दीड ते दोन लाख लोकसंख्या असलेल्या बुलढाणा शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. पावसाच्या अशा लहरीपणाचं चित्र राज्यातील अनेक जिल्ह्यात आपल्याला बघायला मिळत आहे. राज्यात काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा बघायला मिळत आहे.
संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका
बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. नदी नाल्यांना पूर आल्यामुळं तेथील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तसेच शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या अनेक गुरांच्या मृत्यू देखील झाला आहे. जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्याला या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. झालेल्या सर्व नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहे.
अतिवृष्टीग्रस्त संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात रस्त्याचं मोठं नुकसान झालं आहे. या दोन्ही तालुक्यातील 37 पुलांचं नुकसान झालं आहे. अनेक मार्ग देखील बंद झाले होते. अनेक ठिकाणी पुल खचले आहेत तर काही ठिकाणी पुल उखडून पडले आहेत. त्यामुळे संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत.
हिंगोली, जालना, अहमदनगर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाची तूट
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पावसाची तीव्रता आजपासून कमी होणार आहे.
मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट आहे. मुंबईत सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मराठवाडासोबतच मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांचा विचार केला तर राज्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. कोकण आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर हिंगोली, जालना, अहमदनगर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात मात्र पावसाची मोठी तूट दिसते आहे
महत्त्वाच्या बातम्या: