
Buldhana News : तोतया पोलीस अधिकाऱ्याला दिले पिस्तूल अन् 35 जीवंत काडतूस; आठ वर्षांनी गुन्हा दाखल
Buldhana News : पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवत बुलढाणा पोलीस दलाच्या शस्त्रागारातून नऊ एमएमच्या पिस्तूलसह 35 जिवंत काडतूस लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Buldhana News : पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवत बुलढाणा पोलीस (Buldhana Police) दलाच्या शस्त्रागारातून नऊ एमएमच्या पिस्तूलसह (Pistol) 35 जिवंत काडतूस लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या खळबळजनक प्रकरणी पोलीस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांच्या तक्रारीवरुन तब्बल आठ वर्षानंतर बुलढाणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बुलढाणा पोलीस मुख्यालयाच्या शस्त्रागारात पोलीस उपनिरीक्षक असल्याचे भासवून राजेश व्ही. सरपोतदार नामक व्यक्तीने पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडे पिस्तुलासाठी अर्ज केला होता. त्यानंतर अनुषंगिक नऊ एमएम पिस्तूल आणि 35 जिवंत काडतूसे शस्त्रागारातून राजेश व्ही सरपोतदार या तोतयास दिले होते. सरपोतदारने खामगावातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला असल्याचे अर्जात नमूद केले होते. 28 एप्रिल 2014 रोजी ही शस्त्रे सरपोतदारला दिली होती. दरम्यान त्यानंतर पिस्तूल आणि 35 जिवंत काडतुसे सरपोतदारने शस्त्रागारात जमा केले नव्हते. त्यामुळे या प्रकरणात जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक राजेश व्ही सरपोतदार नेमणुकीस आहे का तसेच त्याने पिस्तूल आणि राऊंड्स संबंधित पोलीस स्टेशनच्या हेड मोहरर यांच्याकडे जमा केले आहेत का याबाबत विचारणा करण्यात आली. त्यानंतर समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. अशी व्यक्तीच बुलढाणा पोलीस दलात नसल्याचे समोर आले होते.
अनेक प्रश्न अनुत्तरित
2014 च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बंदोबस्तासाठी इतर जिल्ह्यातून अधिकारी आला का याबाबतही चौकशी केली, मात्र त्यातही काही निष्पन्न झाले नाही. म्हणून बुलढाणा शहर पोलिसांनी 12 ऑक्टोबर या अज्ञात तोतयाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र आठ वर्षांपूर्वी बुलढाणा पोलीस दलाच्या शस्त्रगारातून पिस्तूल आणि 35 जिवंत काडतूस एक व्यक्ती घेऊन गेला आणि याची कोणालाही खबरबात नाही. या गंभीर घटनेची चौकशी बुलढाणा पोलिसांनी का केली नाही? बुलढाणा पोलीस कुणाला वाचवण्यासाठी तर या गंभीर प्रकाराची चौकशी थांबवत तर नाही ना? बुलढाणा पोलिसांचा शस्त्रागार सुरक्षित नाही का? नेलेल्या पिस्तुलाचा वापर कुठे करण्यात आला आहे का? ओळख न पटवता पिस्तूल कशी दिल्या? असे अनेक प्रश्न आता उभे राहत आहेत.
या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यामध्ये 12 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा शहर पोलिसांनी तोतया पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास एपीआय निलेश लोधी करत आहेत.
पोलीस उपअधीक्षकांचा रिमार्क बनावट
2014 दरम्यान बुलढाणा पोलीस दलात कार्यरत पोलीस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडून तोतया पोलीस अधिकाऱ्यास देण्यात आलेला रिमार्क, स्वाक्षरीही बनावट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांना या संदर्भाने विचारणा केली असता त्यांनी तसे बुलढाणा पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे या पिस्तूल आणि 35 जिवंत काडतूस चोरीचे प्रकरण अधिक गूढ बनत आहे. या प्रकरणात आम्ही गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास योग्य दिशेने करण्यात येत असल्याचे तपास अधिकारी एपीआय निलेश लोधी यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
