Nagpur AAP : पंधरा वर्षापासून मनपामध्ये भाजपची सत्ता; राज्यात पाच वर्ष भाजपचे मुख्यमंत्री, तरीही एकही दर्जेदार सरकारी शाळा नाहीः आप आमदार
मनपावर 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. केंद्रात आठ वर्षांपासून सत्ता आहे. पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपदही नागपूरातील नेत्याकडे होते. मात्र तरीही नागपुरात दर्जेदार शिक्षण देणारी एकही शाळा नाही.
नागपूरः गेल्या पंधरा वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. राज्यात पाच वर्षे नागपूरातील मुख्यमंत्री होते. तसेच शहरातील भाजपचे अनेक मोठे नेते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत. मात्र तरीही मनपाच्या शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. नागपूरातील जनतेने आम आदमी पार्टीला संधी दिल्यास शहरात 156 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारणार आहे. तसेच दिल्लीच्या धर्तीवर शैक्षणिक क्रांती घडवून आणू असा विश्वास आम आदमी पार्टीच्या आमदार अतिशी मार्लेना यांनी केले. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
नागपुरातील जनतेला दिल्ली मॉडलच्या धर्तीवर सुशासन, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था देण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणूक आम आदमी पार्टी सर्व जागा स्वबळावर लढविणार आहे. या धर्तीवर आपतर्फे नागरिकांना शिक्षण क्षेत्राच्या दुसरे आश्वासन देण्यात आले. आपकडून 18 जून रोजी नागपूरच्या जनतेला 15000 लिटर शुद्ध पाणी मोफत देण्याचे पहिले आश्वासन दिले होते.
गुरुवारी आप कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आतिशी यांनी निवडणूक कशी लढायची, दिल्लीतील शिक्षण क्षेत्रातील परिवर्तनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जगजीत सिंग यांनी आतिशी यांचा परिचय करुण दिला. तसेच डॉ देवेंद्र वानखेडे यांनी प्रस्ताविक केले. यानंतर आपचे राज्य सचिव धनंजय सिंदे यांनी मार्गदर्शन केले. कविता सिंगल यांनी आभार मानले.
चार लाख विद्यार्थी खासगी शाळेतून सरकारी शाळेत
दिल्ली मध्ये शिक्षण क्षेत्रात आम आदमी पार्टीच्या सरकारकडून अमुलाग्र बदल करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. शिक्षणाचे बजेट 22% करून सरकारी शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगल्या दर्जेदार बनविल्यात. त्यामुळे मागच्या वर्षी चार लक्ष विद्यार्थ्यांनी खाजगी शाळेतून नावे काढून सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे. तसेच दिल्लीच्या शाळांचे निकाल खासगी शाळांपेक्षा चांगले येत आहे. सरकारी शाळेमधील विद्यार्थी IIT, AIIMS मध्ये प्रवेश घायला लागले असल्याचे यावेळी अतिशी यांनी सांगितले.
मनपाच्या शिक्षण विभागाचा प्रवास
- नागपूर शहराची लोकसंख्या 1995 मध्ये 15 लाखांच्या घरात होती. त्यावेळी मनपा शिक्षणविभागाद्वारे 274 प्राथमिक शाळा, 17 हायस्कूल आणि 2 ज्यूनिअर कॉलेज चालवण्यात येत होते. त्यावेळी यात सुमारे 90,000 विद्यार्थी शिक्षण घेत होते. तर शिक्षक संख्या 3500 होती.
- आता शहराची लोकसंख्या 40 लाखांच्या घरात आहे. 1995च्या तुलनेत 200% टक्के लोससंख्या वाढली आहे. मनपाच्या बजेटमध्येगी 1000 टक्के वाढ झाली आहे. मनपाचे 2021-22 चे बजेच 2200 कोटींचे आहे. तरी शिक्षणाचे बजेट हे फक्त 3 टक्केच आहे. मनपा दरवर्षी 100 कोटी शिक्षणावर खर्च करत असल्याचा दावा करत असल्याचेही यावेळी आपतर्फे सांगण्यात आले.
- सध्या150 शाळा बंद करण्यात आल्या आहेत. सध्या 137 शाळा बाकी आहे. यापैकी 20 शाळा बंद करण्यात येणार असल्याचेही आपतर्फे सांगण्यात आले.
- शहराच्या लोकसंख्येत 200टक्के वाढ झाली असली तरी शाळांची संख्या कमी करण्यात आली आहे. तर सध्या फक्त 19000 हजार विद्यार्थी तर शिक्षक संख्या 900 आहे. यावरुन भाजपा शिक्षणाबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत असल्याचा टोलाही आप नेत्यांनी लागावला.
अनेक शाळांमध्ये नेत्यांचे कार्यालय
गांधीबाग येथील एका शाळेत भाजपच्या नगरसेवकाचे कार्यालय असल्याचे काही वर्षांपूर्वी उघड झाले होते. त्यानंतर काही काळासाठी कार्यलय बंद करण्यात आले होते. मात्र नंतर त्याठिकाणी राजकीय हालचाली सुरु झाल्या होत्या. अशाच प्रकारे शहरातील मनपाच्या अनेक शाळांवर नगरसेवक आणि नेत्यांची अवैध पद्धतीने ताबा केल्याचे सूत्रांनी सांगितले.
'आप'चा शिक्षण वचननामा
- नागपुरात 156 वार्ड आहेत – 156 दर्जेदार (दिल्ली मॉडेल प्रमाणे) शाळा तयार करणार
- शिक्षणाचे बजेट 15% पेक्षा जास्त करणार
- शिक्षकांना अद्ययावत ट्रेनिंग देण्याची व्यवस्था करणार
- शाळांच्या इमारती व सोई - सुविधा अद्ययावत करणार ( बिल्डींग, प्रयोगशाळा, वर्ग, स्मार्ट बोर्ड, क्रीडांगणे व इतर सुविधा)
- चांगला दर्जेदार अभ्यासक्रम राबविणार
- पालक सभा चालू करून पालकांना विश्वास देणार, त्यांचा सहभाग घेणार,
- जनतेला आवाहन करून जनतेचा सहयोग घेणार
- गरजू विद्यार्थ्यांसाठी निशुल्क ट्युशन वर्ग सुरु करणार
बजेटसाठी आवश्यक निधीचे नियोजन
- शिक्षणाचे बजेट 10% पेक्षा जास्त करणार, संपूर्ण बजेट इमानदारीने खर्च करणार
- पाणीपुरवठा योजनेत 100 कोटींची बचत करणार
- मनपाकडून वारंवार रस्ते निर्मिती दुरुस्तीवर होणारी कोट्यावधीची उधळपट्टी बंद करणार
- भ्रष्ट्राचार संपवून पैसे वाचविणार
- जाहिरातीच्या माध्यमातून फंड उभारणार