Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार, शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप, नरेंद्र भोंडेकरांकडून खदखद व्यक्त
Narendra Bhondekar : वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं शिवसेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी म्हटलं आहे.
भंडारा : राज्याच्या महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. मंत्रिमंडळात स्थान नं मिळाल्यानं भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नाराजी व्यक्त करताना शिवसेनेचे उपनेते पद आणि पूर्व विदर्भाच्या समन्वयक पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी मौन सोडताना, एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. मागील सत्ता स्थापनेच्या वेळी कोणत्याही अटी शर्ती विना मी शिंदेनं सोबत गेलो. त्यानंतर भाजपाचा आग्रह असतानाही शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, शिवसेनेने आता मला मंत्रिपदाचं आश्वासन दिल्यानंतरही डावलल्याने शिवसेनेत गेल्याचा पश्चाताप होत असून वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देणार
मागील सरकारच्या वेळेस 10 अपक्ष आमदारांपैकी एकनाथ शिंदेंसोबत जाणारा सर्वात पहिला आमदार जाणारा मी होतो. भाजप - शिवसेना भाजपचे सरकार अस्तित्वात येणार असल्याने कुठल्याही अपेक्षा विना मी शिंदेंसोबत गेलो होतो. त्यावेळी मला पुढल्या वेळेस जेव्हा सरकार येईल त्यावेळेस नक्कीचं तुम्हाला सन्मानानं मंत्रिपद देऊ, असं आश्वासन दिलं होतं. ज्यावेळी शिवसेनेत पक्षप्रवेश झाला त्यावेळी चर्चा झाली मात्र मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही, महामंडळाची फाईल मुव्ह झाली. त्यानंतर सरकार जेव्हा येईल तेव्हा पहिल्या मंत्रिमंडळात स्थान देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. जाहीर सभेत सुद्धा बोलणं झालं होतं. मात्र, एवढं बोलणं झाल्यानंतर सुद्धा आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात जे मागून आलेत त्यांना स्थान देण्यात आलं. जे पक्षासोबत प्रामाणिक राहत नाहीत त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचा भाजपमध्ये येण्याचा आग्रह
शिवसेनेत उपनेतेपद हे सर्वात मोठं पद आहे. पूर्व विदर्भाचा समन्वयक म्हणून सहा जिल्ह्याची माझ्याकडं जबाबदारी आहे. मात्र, माझ्याशी कुठलेही चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असं वाटल्यानं मी शिवसेना उपनेते आणि विदर्भा चा समन्वय पदाचा राजीनामा दिलाय, असं नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
वेळ पडल्यास मी आमदारकीचा राजीनामा सुद्धा देणार. आम्हाला उधारीचा पालकमंत्री नकोय, जिल्ह्याचा पालकमंत्री हवा, ही आग्रहाची भूमिका आम्ही ठेवून शिवसेनेत पक्षप्रवेश केला. मला देवेंद्र फडणवीस यांचा भाजपमध्ये येण्यासाठी फार मोठा आग्रह होता. मात्र, मी शिवसेनेत जाणं पसंत केलं. पण मला आता शिवसेनेत गेल्यानंतर पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय. आमचा अधिकार शिंदे साहेबांवर होता. त्यामुळे आम्ही शिवसेनेत गेलो. मात्र, शिंदे साहेबांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. पूर्व विदर्भाचा समन्वयक म्हणून एवढा मोठा पद मला दिलं, मात्र त्या पदाला कुठेही अर्थ आता राहिला नाही, असंही नरेंद्र भोंडेकर म्हणाले.
प्रामाणिकतेचा अर्थ राहत नाही, हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून दिसून येतं. त्यामुळं प्रामाणिक कितीही राहा त्याला किंमत नाही. जे हुल्लडबाजी करतात त्यांना न्याय मिळतं असं दिसतंय, अशी खरमरीत टीका भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.
इतर बातम्या :