OBC Reservation : ...तर दुर्गेचा अवतार धारण करणार, ओबीसी महिला एकवटल्या, टायर पेटवत 'रास्ता रोको'
Beed News : एक ओबीसी कोटी ओबीसी, ओबीसी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देत चक्क महिलांनीच राज्य महामार्ग आडवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
बीड : एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) ओबीसीतून मिळावे या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये, या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे आता मराठा विरुद्ध ओबीसी वादामुळे राज्यात वातावरण तापत आहे. बीड, नगर, कल्याण, धामणगाव महामार्गावर ओबीसी महिला भगिनींनी टायर जाळत रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हातोला येथील राज्यमार्ग बीड, नगर, धामणगाव, हातोला येथे शेकडो महिला भगिनींनी रस्त्यावर उतरून ओबीसी आरक्षण बचावासाठी रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. एक ओबीसी कोटी ओबीसी, ओबीसी एकजूटीचा विजय असो, अशा घोषणा देत चक्क महिलांनीच राज्य महामार्ग आडवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
...तर दुर्गेचा अवतार धारण करणार
पंकजा मुंडे यांनी सरकारला जे लेखी पत्र दिले आहे. त्याची सरकारने तात्काळ दखल घ्यावी व ओबीसीमधून कोणालाच मिळवू नये, यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. प्रथमच महिलांनी रस्ता रोको आरक्षण बचावासाठी सुरू केला आहे. सरकारने आमच्या भावनांचा विचार केला नाही तर दुर्गेचा अवतार धारण करू, असा इशारा यावेळी महिला आंदोलकांनी दिला आहे.
लक्ष्मण हाकेंना पाठींबा देण्यासाठी लोहा शहरातून 200 गाड्या रवाना
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येते लक्ष्मण हाके यांचा ओबीसीमधून आरक्षण देऊ नका, या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातून 200 गाड्या वडीगोद्री येथे रवाना झाल्या आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळाला होता. आता लक्ष्मण हाके यांच्या सुद्धा आंदोलनाला पाठिंबा नांदेड जिल्ह्यातून मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सह्याद्रीवर आज बैठकीचे आयोजन
दरम्यान, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यात मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता. शिष्टमंडळाकडून लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र ते उपोषणावर ठाम आहेत. यानंतर गिरीश महाजन यांनी हाके आणि वाघमारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली. आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर आंदोलकांचे शिष्टमंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत काय निघणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा