तलाठी भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल
Talathi Bharti Exam : तलाठी भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणी करण्यासाठी मंगळवारी शेकडो विद्यार्थ्यांनी बीड शहरातील रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
बीड : तलाठी भरती परीक्षेत (Talathi Bharti Exam) झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी आणि सर्व परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात यावी यासाठी बीडच्या (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी (Students) मंगळवारी मोर्चा काढला होता. याच मोर्चानंतर आता बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणून रस्ता अडवल्याबद्दल तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करून या घटनेबद्दल राज्य सरकारचा निषेध केला आहे.
तलाठी भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागणी करण्यासाठी मंगळवारी शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला होता. आंदोलक धनंजय गुंदेकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर, परवानगी असल्यावर सुद्धा आंदोलन करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, सरकार विद्यार्थ्यांची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप धनंजय गुंदेकर यांनी केला आहे. तर, कितीही गुन्हे दाखल झाले तरी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर, महाराष्ट्रभर विद्यार्थी आपल्या न्याय मागण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं देखील ते म्हणाले.
परीक्षार्थींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत
दरम्यान, यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की,“ तलाठी पदभरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देऊन ही, सरकार कारवाई करत नाही. दुसरीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. आतापर्यंत राजकीय विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या महायुती सरकारने या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली होती. आता पुढे जाऊन गुन्हे दाखल करण्यापर्यंत या सरकारची मजल गेली आहे. इतका मुजोरपणा? परीक्षार्थींवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
तलाठी पदभरतीत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देऊन ही, सरकार कारवाई करत नाही...दुसरीकडे राज्यातील हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 17, 2024
आतापर्यंत राजकीय विरोधकांवर दडपशाही करणाऱ्या महायुती सरकारने या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाईची धमकी दिली होती.
आता पुढे जाऊन गुन्हे दाखल… pic.twitter.com/y0E3UjuTFU
चोर सोडून सन्याशाला फाशी
दरम्यान आमदार रोहित पवारांनी देखील ट्वीट करत यावरून सरकारवर टीका केली आहे. “तलाठी भरतीतील गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात कोणतीही कारवाई न करता गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या सरकारने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र तातडीने गुन्हे दाखल केले. यावरून या सरकारची नियत किती खोटी आहे हे स्पष्ट होतं. चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. शिवाय परिक्षार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची केवळ धमकी देऊन हे सरकार थांबलं नाही, तर प्रत्यक्ष गुन्हे दाखल केल्याबद्दल सरकारला साष्टांग दंडवत!.. सरकारने आज परिक्षार्थ्यांवर गुन्हे दाखल केले, पण एक दिवस या सरकारलाही परीक्षा द्यायचीय हे त्यांनी विसरू नयेत" असे रोहित पवार म्हणाले.
तलाठी भरतीतील गैरप्रकार आणि पेपरफुटीविरोधात कोणतीही कारवाई न करता गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या या सरकारने आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र तातडीने गुन्हे दाखल केले... यावरून या सरकारची नियत किती खोटी आहे हे स्पष्ट होतं.. चोर सोडून सन्याशाला फाशी… pic.twitter.com/0RKqtZjBkm
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 16, 2024
इतर महत्वाच्या बातम्या:
दहा लाखात तलाठी व्हा! पेपरफुटी प्रकरणी विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप