Beed Crime News: 'तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस', बीडमध्ये विवाहितेचा सासरच्यांकडून छळ, कंटाळून महिलेने आयुष्य संपवलं
Beed Crime News: “तू रंगाने काळी आहेस” असे म्हणत वारंवार मानसिक छळ केल्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने विष प्राशन आपले जीवन संपवल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे.

Beed Crime News: बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव (Majalgaon) तालुक्यात एका विवाहित महिलेच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. “तू रंगाने काळी आहेस” असे म्हणत वारंवार मानसिक छळ केल्यामुळे त्रस्त झालेल्या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव ज्योती पवार असे असून तिचा विवाह 2018 मध्ये माजलगाव तालुक्यातील तळतांडा (तालखेड परिसर) येथील कृष्णा पवार याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार सुरळीत सुरू होता. मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाल्याचे समोर आले आहे.
Beed Crime News: “तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस”
पतीच्या व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावत सासरच्या मंडळींकडून तिच्यावर दबाव टाकला जात होता. यासोबतच “तू रंगाने काळी आहेस, आम्हाला आवडत नाहीस” अशा शब्दांत तिचा वारंवार अपमान केला जात असल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक छळामुळे ज्योती पवार प्रचंड त्रस्त झाली होती.
Beed Crime News: पतीसह सासू-सासर्यावर गुन्हा दाखल
या छळाला कंटाळून ज्योतीने 12 जानेवारी 2026 रोजी विष प्राशन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला उपचारासाठी प्रथम छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे, त्यानंतर पुणे (Pune) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवस उपचार सुरू असतानाच 18 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार 13 मार्च रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात (Majalgaon Rural Police Station) पती कृष्णा पवार, सासरा मनोहर पवार आणि सासू ताराबाई पवार या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
Beed Crime News: 1000 रुपयांसाठी विद्यार्थ्याला अमानुष मारहाण
दरम्यान, बीड जिल्ह्यातील गेवराई येथे एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वस्तीगृह चालकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. केवळ एक हजार रुपयांच्या थकीत शुल्कासाठी विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पालकाच्या तक्रारीवरून गेवराई पोलिसांनी वस्तीगृह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गेवराई तालुक्यातील मारफळा तांडा येथील ऊसतोड मजूर बाळू जाधव यांचा मुलगा गेवराई येथील सूर्योदय निवासी वस्तीगृहात राहून शिक्षण घेत आहे. बाळू जाधव यांनी चालू वर्षासाठी वस्तीगृहाचे एकूण ३९ हजार रुपये शुल्क भरले होते. मात्र त्यातील केवळ एक हजार रुपये थकीत होते. याच रकमेवरून वस्तीगृह चालक सुरेश राठोड सतत तगादा लावत होता. दरम्यान, शुल्क वेळेवर न दिल्याच्या कारणावरून सुरेश राठोड याने विद्यार्थ्याला शिवीगाळ करत बेदम अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे विद्यार्थी घाबरून गेला असून घटनेची माहिती पालकांना मिळताच त्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली. पालकांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात सुरेश राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा





















