Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सरपंच परिषद आक्रमक; देशमुखांच्या पत्नीला शासकीय नोकरी, 50 लाखांची मदतीची मागणी
Santosh Deshmukh Case: राज्यातील सरपंच मुंबईत येत एकदिवसीय आंदोलन करणार आहेत. सरपंच परिषदेकडून आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केलं जाणार आहे.
बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यभरातून अनेक मागण्या केल्या जात आहेत, अनेक आंदोलने होत आहेत. अशातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणी सरपंच परिषद देखील आक्रमक झाली आहे. राज्यातील सरपंच मुंबईत येऊन एकदिवसीय आंदोलन करणार आहेत अशी माहिती आहे. सरपंच परिषदेकडून आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. दरम्यान सरपंच परिषदेकडून काही मागण्या करण्यात आल्या आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोक्काअंतर्गत कारवाई करावी. मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवर कारवाई व्हावी. देशमुख यांच्या पत्नीला शासकीय नोकरी आणि 50 लाखांची मदत करण्यात यावी. ग्रामपंचायत कामात अडथळा आणल्यास सरपंच उपसरपंच यांना 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची परवानगी द्यावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा मागण्या सरपंच परिषदेकडून करण्यात आल्या आहेत. मस्साजोग घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. या घटनेमुळे सर्व सरपंचांमुळे असंतोषाचे वातावरण असून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. मारेकऱ्यांना आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई करावी. संतोष देशमुख याच्या पत्नीला शासकिय नोकरी व 50 लाखांची मदत देण्यात यावी अशी मागणी करत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केलं जाणार आहे.
वाहतूक खोळंबली वाहनाच्या लांबच लांब रांगा
लातूर आंबेजोगाई लातूर बीड लातूर परभणी वाहतूक खोळंबली आहे. रेनापुर येथील चक्काजाममुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात आंदोलन केलं जात आहे. लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली आहे. वाल्मिक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. सकल मराठा समाजाच्या वतीने अंबेजोगाई - लातूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केलं आहे. लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात आज ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं जात आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. रेनापुर येथील चक्काजाम आंदोलनामुळे लातूर आंबेजोगाई, लातूर बीड, लातूर परभणी, या मार्गावरील वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे. चक्काजाम आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दुतर्फा वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.